मध्य रेल्वेवर ‘परिवर्तन’ होणार का?

By Admin | Updated: June 4, 2015 08:43 IST2015-06-04T05:19:42+5:302015-06-04T08:43:09+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटी ते ठाणे डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट)-एसी (२५ हजार व्होल्ट अल्टरनेट करंट) परावर्तन कायमस्वरूपी करण्यावरून

Will there be a change in the Central Railway? | मध्य रेल्वेवर ‘परिवर्तन’ होणार का?

मध्य रेल्वेवर ‘परिवर्तन’ होणार का?

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटी ते ठाणे डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट)-एसी (२५ हजार व्होल्ट अल्टरनेट करंट) परावर्तन कायमस्वरूपी करण्यावरून अजूनही तळ्यात-मळ्यातच सुरू असल्याचे समोर आले आहे. या परावर्तनाची गेल्या काही दिवसांपासून रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी करण्यात आली आहे. अखेरची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी बुधवारी केल्यानंतर आता याचा अहवाल मध्य रेल्वेला देण्यात येणार आहे. त्यानंतर डीसी-एसी परावर्तन कायम कधी होईल, हे स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.
मध्य रेल्वे मार्गावर कल्याणपुढे डाऊन दिशेला डीसी ते एसी परावर्तनाचे काम पूर्ण झाले होते. तर ठाणे ते सीएसटीपर्यंतचे काम रखडले होते. नुकतेच ठाणे ते एलटीटी अशा लांब पल्ल्याच्या मार्गावर काही महिन्यांपूर्वी काम पूर्ण करण्यात आल्यानंतर ठाणे ते सीएसटीपर्यंत चारही मार्र्गांवरील कामही दीड महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आले आणि त्याची चाचणीही यशस्वीरीत्या पार पडली. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतरही डीसी-एसी परावर्तन नियमितपणे सुरू करण्यात आले नाही. परावर्तन झाल्यास गाड्यांचा वेग वाढण्याबरोबरच वीज बचतही होणार आहे. या परावर्तनाला मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरीही दिली आहे. परंतु प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडून या परावर्तनाची गेल्या काही दिवसांपासून पाहणी करण्यात येत आहे. ही पाहणी करतानाच कमी उंचीच्या नऊ पुलांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. एसी परावर्तनात ओव्हरहेड वायरची उंची वाढविण्यात आली असून नऊ पुलांखालील ओव्हरहेड वायरचाही यात समावेश आहे. यामुळे परावर्तन कायमस्वरूपी किंवा नियमित केल्यावर या नऊ पुलांखालून ट्रेन गेल्यास ओव्हरहेड वायर पुलाला स्पर्श करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्यांना त्याचा धोका होऊ शकतो, असेही आयुक्तांकडून मध्य रेल्वेला सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे यावर मध्य रेल्वेकडून तोडगा काढण्यात येत आहे. बुधवारी आयुक्तांकडून अखेरची पाहणी करण्यात आल्यानंतर आता संपूर्ण पाहणीचा अहवाल मध्य रेल्वेला पाठवणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Will there be a change in the Central Railway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.