Join us  

फ्लॅटचे शेअर्स हस्तांतरित केल्याने अल्पवयीन मुलीला लाभ मिळणार का? कोर्टाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 6:35 AM

उच्च न्यायालयाचा याचिकाकर्ता आईला सवाल

मुंबई : अल्पवयीन मुलीचे फ्लॅटचे शेअर्स तिच्या मामाच्या नावावर हस्तांतरित केल्याने त्याचा तिला काय फायदा होणार, असा सवाल उच्च न्यायालयाने मुलीच्या आईला केला. मुलगी व आई ५ जून रोजी जैन धर्मानुसार दीक्षा घेणार असल्याने आईने स्वतःचे व अल्पवयीन मुलीचे शेअर्स  तिच्या भावाच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.

आई (४४) व तिच्या तीनपैकी एका भावाने आपल्याला अल्पवयीन मुलीचे कायदेशीर पालक म्हणून नियुक्त करावे, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच मुलीचा ५०५ चौरस मीटर क्षेत्रफळामधील तिचा हिस्सा बक्षीस म्हणून मामाच्या नावे करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने स्वेच्छेने जगाचा त्याग करून जैन साधू बनण्याचा निर्णय घेतला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. मुलीच्या वडिलांचा जुलै २०१२ मध्ये मृत्यू झाला. 

पालक व पाल्य अधिनियम १८९०, हिंदू अल्पसंख्याक व पालकत्व कायदा, १९५६ अंतर्गत पालकत्व याचिका दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांच्या कल्याणाबाबत मार्गदर्शन करणे, हे या दोन्ही कायद्यांचे उद्दिष्ट आहे. मुलगी सज्ञान झाल्यावर तिने तिचा विचार बदलून सामान्य आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला तर काय होईल, असा प्रश्न न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने मुलीच्या आईला केला. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी न्यायालयाने मुलीच्या आईला अतिरिक्त  प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी न्यायालयाला साहाय्य ॲड. नौशाद इंजिनियर यांची ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून नियुक्ती केली आहे.

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबईशेअर बाजार