Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा पहिला वृद्धाश्रम ज्येष्ठांचा ‘आधार’ ठरणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:31 IST

मुंबईसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात कुटुंब व्यवस्थेतही मोठे बदल होत आहेत. मुलांचे परदेशात स्थायिक होणे, नोकरी-व्यवसायानिमित्ताने वेगळे राहणे किंवा कुटुंबातील मतभेद यामुळे अनेक वयोवृद्धांना एकाकी आयुष्य जगावे लागते. अशा परिस्थितीत वृद्धाश्रम त्यांचा ‘आधार’ बनतो.

सुजित महामुलकर, विशेष प्रतिनिधी

मुबईकरांना पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने आता वयोवृद्ध नागरिकांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गोरेगाव पूर्व येथील रहेजा रिजवूड परिसरात पालिकेचा पहिला वृद्धाश्रम उभारण्यात येत आहे. त्याची इमारत जवळपास पूर्ण झाली आहे. ८० ते ८२ खाटांच्या या वृद्धाश्रमांसाठी १३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापालिका स्तरावर राबवला जाणारा हा देशातील बहुधा पहिलाच उपक्रम असावा. 

मुंबईसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात कुटुंब व्यवस्थेतही मोठे बदल होत आहेत. मुलांचे परदेशात स्थायिक होणे, नोकरी-व्यवसायानिमित्ताने वेगळे राहणे किंवा कुटुंबातील मतभेद यामुळे अनेक वयोवृद्धांना एकाकी आयुष्य जगावे लागते. अशा परिस्थितीत वृद्धाश्रम त्यांचा ‘आधार’ बनतो.

मुंबईत काही संस्था वृद्धाश्रम चालवतात. मात्र, त्यापैकी अनेक संस्था प्रवेश शुल्क, मासिक देखभाल खर्च आणि वैद्यकीय सेवांसाठी भरमसाठ शुल्क घेतात. त्यामुळे आर्थिक दुर्बल आणि निम्न-मध्यमवर्गीय वयोवृद्धांना अशा वृद्धाश्रमांचा आधार घेणे  कठीण जाते. महापालिकेचा वृद्धाश्रम सुरू झाल्यास कमी दरात किंवा अनुदानित दरात सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.   

महापालिकेने गोरेगाव पूर्व येथील राम मंदिर रोडवर तळमजला अधिक नऊ मजल्यांची इमारत उभारली आहे. मात्र हा वृद्धाश्रम प्रत्यक्षात कसा चालवला जाणार, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. स्वतः हा वृद्धाश्रम चालवण्याऐवजी निविदा प्रक्रिया राबवून तो खासगी संस्थेला चालवण्यास देण्याचा विचार महापालिका प्रशासन करीत असल्याचे सांगण्यात येते. 

प्रवेश प्रक्रिया, उत्पन्न मर्यादा, मासिक किंवा वार्षिक शुल्क, तसेच मुंबईबाहेरील ज्येष्ठांचा प्रवेश याबाबतची नियमावली तयार करण्यात येत आहे. महापालिकेने स्पष्ट धोरण आखून शुल्क नियंत्रण ठेवले आणि पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे सक्षम संस्थेची निवड केली, तर हा प्रकल्प अनेक वयोवृद्धांसाठी मोठा आधार ठरू शकतो.

या वृद्धाश्रमाततळमजल्यावर प्रथमोपचार केंद्र, औषधांचे दुकान, प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णवाहिका आदी सुविधा असतील. पहिल्या मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग, फिजिओथेरपी कक्ष आणि डे-केअर हॉल प्रस्तावित आहे. दुसऱ्या मजल्यावर स्वयंपाकघर, भोजनगृह आणि कपडे धुण्याची व्यवस्था असेल. तिसऱ्या ते आठव्या मजल्यांवर एकेरी आणि दुहेरी खाटांच्या खोल्या असतील, तर नवव्या मजल्यावर एकेरी खोल्यांसह मनोरंजनासाठी स्वतंत्र हॉलची सोय असेल.  

मुंबईत १५ लाख ज्येष्ठ नागरिकमुंबईत १५ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. असे म्हटले जाते की, मुंबईकर आणि महापालिका यांचा संबंध जन्मापासून मृत्यूपर्यंत राहतो. 

अशा परिस्थितीत आयुष्याच्या उत्तरार्धात गरजू ज्येष्ठांसाठी महापालिकेने पालकत्वाची भूमिका स्वीकारली तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक दृढ होऊ शकते. हा प्रयोग यशस्वी ठरला, तर इतर शहरांतील महापालिकांसाठीही तो आदर्श ठरू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai's First Municipal Old Age Home: A Support for Seniors?

Web Summary : Mumbai's municipality is building its first old age home in Goregaon East, costing ₹13 crore. Aimed at aiding seniors facing isolation, it offers affordable facilities, a potential model for other cities if managed well.
टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका