मुंबई : यंदाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असल्यामुळे मुंबई महापालिकेकडे करवसुलीसाठी एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. ४ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडे तीन हजार ६०८ कोटींचा मालमत्ता कर गोळा झाला असून, अद्याप दोन हजार ५९२ कोटींची वसुलीचे लक्ष्य प्रशासनापुढे आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षासाठी पालिकेचे मालमत्ता करवसुलीसाठी एकूण सहा हजार २०० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले असून, अंतिम मुदतीपूर्वी कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात कठोर दंडात्मक कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे.
‘दंडात्मक कारवाई टाळा’
मालमत्ताधारकांकडून वेळेत कर संकलित करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान मुदतीत कर भरून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुदतीत कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजाविण्यात येत आहे.
त्यात मुदतीत कर न भरल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर आधी जप्ती आणि मग त्याचा लिलाव करण्यात येईल, असे म्हटले आहे.
‘ती’ मुदत १३ डिसेंबरपर्यंत
मालमत्ता कर भरणा करण्यासाठी पहिल्या सहामाहीची अंतिम मुदत शनिवार, १३ डिसेंबर २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी या अंतिम मुदतीपूर्वी कर भरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्ता कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
... या मालमत्तांची जप्ती
nमालमत्ता कर न भरल्यामुळे तीन हजार ६०५
मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी-व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे.
nपश्चिम उपनगरात सर्वाधिक म्हणजे एक हजार ७६७, शहर विभागात एक हजार २३२, तर पूर्व उपनगरातील ६०६ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या तीन हजार ६०५ मालमत्ताधारकांकडे एकूण एक हजार ६७२ कोटी ४१ लाख रुपयांची कर थकबाकी आहे.