Join us  

वंचितकडून दक्षिण-मध्य मुंबईतून सुजात आंबेडकर रिंगणात उतरणार?

By मनोज गडनीस | Published: April 04, 2024 1:49 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्ये सहभागी न झाल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai South Central Lok Sabha Constituency) प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात (Sujat Ambedkar) यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे समजते.

- मनोज गडनीसमुंबई - महाविकास आघाडीमध्ये सहभागी न झाल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे समजते. जर वंचित महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले असते तर स्वतः प्रकाश आंबेडकर यांना या मतदारसंघातून लढण्यात रस होता. मात्र, ते अकोला येथून लढणार असल्याने या मतदारसंघातून मुलगा निवडणूक लढविणार असल्याची माहिती आहे.

दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण १६ टक्क्यांच्या आसपास बहुजन समाजाचे मतदार आहेत. तर, मुस्लीम समाजाच्या मतदारांचे प्रमाण २३ टक्के इतके आहे. या दोन्ही समाजाचे मतदार प्रामुख्याने धारावी, वडाळा आणि सायन-कोळीवाडा येथील आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना धारावीतून ५७,९२३ मते मिळाली होती. तर, तेथून वंचितच्या संजय भोसले यांना धारावीतून ४,७३० मते मिळाली होती. सायन-कोळीवाडा येथून गायकवाड यांना ५१,५०५० तर वंचितला ८,२२१ तसेच वडाळा येथून गायकवाड यांना ३३,९१८ तर वंचितला ८,७९१ मते मिळाली होती. या सहा विधानसभा मतदारसंघांतून काँग्रेसला एकूण ३४.८ टक्के तर वंचितला ८.१ टक्के मते मिळाली होती. राहुल शेवाळे यांना एकूण ५४.२ टक्के मते मिळाली होती. शेवाळे यांना सर्वाधिक मताधिक्य माहिम, चेंबूर, अणुशक्ती नगर आणि सायन-कोळीवाडा येथून मिळाल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला होता. 

...तर बहुजन, मुस्लीम समाजाची मते फिरणारधारावी हा एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या पश्चात धारावीची विधानसभा जागा कायम राखली आहे. गायकवाडांचे प्राबल्य असल्यामुळे गेल्यावेळी त्यांना बहुजन व मुस्लीम समाजाची मते मिळाली होती. मात्र, यंदा सुजात आंबेडकर हे निवडणूक लढविणार असतील तर बहुजन व मुस्लीम समाजाची मते त्यांच्याकडे फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा आम्ही विचार करत आहोत. सुजात यांच्या नावाची चर्चा आहे. पण उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही.- सिद्धार्थ मोकळे, मुख्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी.

टॅग्स :वंचित बहुजन आघाडीमुंबई दक्षिण मध्यमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४