Join us

जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत भाजपाच्या कार्यक्रमातून अलिप्त राहणार - गोपाळ शेट्टी

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 11, 2025 17:21 IST

गोपाळ शेट्टी यांनी या पाडकामाच्या कारवाईला विरोध केला आहे.

मुंबई : बोरिवली (पश्चिम) जोड मार्गावरील, एस.के. रिसॉर्ट जवळील के. डिव्हाईन लॉन्स अँड कन्व्हेन्शन' हे सुमारे २० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर वसलेल्या खासगी मंगल कार्यालयावर आर मध्य विभागाने निष्कासन कार्यवाही केली. त्यामुळे उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी संतप्त झाले आहेत. जोपर्यंत जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत भाजपाचे काम आणि कार्यक्रमापासून अलिप्त राहणार अशी घोषणा त्यांनी केली. या संदर्भात त्यांनी फेसबुक लाईव्ह घेत एक व्हिडीओ सोशल मीडियावर जारी केला आहे.

गोपाळ शेट्टी यांनी या पाडकामाच्या कारवाईला विरोध केला आहे. सर्व आवश्यक परवानग्या घेतल्यानंतरच बांधकाम करण्यात आले होते, तरीही ते पाडून पालिकेने कोट्यवधींचे नुकसान केले असल्याची टीका त्यांनी केली.

मुंबईत घर बांधण्यासाठी ही महानगरपालिका अधिकारी, आरटीआय कार्यकर्ते, राजकारणी यांना लाच द्यावी लागते हे सर्वांना माहिती असल्याचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. या प्रकरणात जबाबदार असलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. महानगरपालिकेने कायदा डावलून सदर कारवाई केली आहे. न्यायालय या प्रकरणाची दखल घेईल आणि महानगरपालिकेवर दंडात्मक कारवाई करेल असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

टॅग्स :गोपाळ शेट्टीमुंबईभाजपा