Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया, राहुल गांधींना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नेणार का? भाजप MLAचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

By मनोहर कुंभेजकर | Updated: August 30, 2023 16:53 IST

आमदार भातखळकर म्हणाले की, उद्या ‘इंडिया’ नामक एक बोगस आघाडी उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुंबईत येत आहे.

मुंबई : ज्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कधीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी साधे एक ट्विट केले नाही, अशा मायलेकांसह तथाकथित धर्मनिरपेक्ष नेत्यांना घेऊन उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार का? असा सवाल भाजप नेते व कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे  आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. उद्या गुरुवारी होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

आमदार भातखळकर म्हणाले की, उद्या ‘इंडिया’ नामक एक बोगस आघाडी उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुंबईत येत आहे. या निमित्ताने माझे उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न आहेत. त्याची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी द्यावीत. ज्या राहुल गांधीनी नेहमी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची बदनामी केली. त्या राहुल गांधींची स्वा. सावरकर यांच्या मुद्दयावरून कानउघडणी करणार का? आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री याच बोगस आघाडीच्या माध्यमातून तुमचा पाहुणचार घेण्यासाठी मुंबईत येत आहेत, त्यांना बेळगाव आणि सीमाभागातील मराठी बांधवांवर केले जाणारे अत्याचार, त्यांचे प्रश्न हे विषय उपस्थित करून त्यांना खडेबोल सुनावणार का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी आधी द्यावीत आणि मगच त्यांनी तथाकथित ‘इंडिया’ आघाडीविषयी बोलावे, असेही आमदार भातखळकर म्हणाले. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेअतुल भातखळकरसोनिया गांधीराहुल गांधीइंडिया आघाडी