Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या समस्या सोडविणार, सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:14 IST

Ramdas Athawale : आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देऊ. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना सर्व नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्नशील राहील, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

मुंबई : मुंबई ठाणे परिसरात  राहणारे आदिवासी हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. आरे कॉलनी नॅशनल पार्क जवळच्या डोंगर-जंगलात वर्षोनुवर्षे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या मूलनिवासी असलेल्या आदिवासींना वन विभागाच्या नियमांचा जाच होतो. त्यातून त्यांना अनेक नागरी सोयीसुविधा मिळत नाहीत. संविधानाने सर्व भारतीयांना अन्न वस्त्र निवाऱ्याचा मूलभूत हक्क दिला आहे. त्यानुसार आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देऊ. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना सर्व नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्नशील राहील, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

बांद्रा पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे मुंबई उपाध्यक्ष अंकुश भोईर यांच्या नेतृत्वात अनेक आदिवासीनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. यावेळी तारपा नृत्य सादर करून रामदास आठवले यांचे आदिवासींनी स्वागत केले. मुंबईत पवई, गोरेगाव, आरे कॉलनी, नॅशनल पार्क, गोराई, बोरिवली, मढ, मालाड, मरोळ, अंधेरी आदी भागात आदिवासी राहत आहेत. त्यांचा अजूनही  मुंबईच्या मुख्य प्रवाहात प्रवेश झालेला नाही. त्यांना अजून ही लाईट पाण्याच्या प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. आदिवासींच्या विविध प्रश्नांची सोडवणूक रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षच करू शकतो. त्यामुळे काँग्रेसला रामराम ठोकून रिपब्लिकन पक्षात आज आम्ही प्रवेश केल्याचे अंकुश भोईर यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, अंकुश भोईर यांच्या नेतृत्वात आदिवासी कार्यकर्ते श्याम वांगड, मंदा कोचरेकर, मंगला वाडेकर, गीता भोगाडे, मनोज पाटकर, आनंद भावर, रमेश पाटकर, विलास ठाकरे, सुरज महाले, शांताराम चांदेकर आदींनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला, अशी माहिती रिपाइंचे झोपडपट्टी आघाडीचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाळे यांनी दिली आहे. यावेळी रिपाइंचे राज्य अध्यक्ष भुपेश थुलकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, जिल्हा अध्यक्ष विवेक पवार, अमित तांबे, भीमराव कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :रामदास आठवले