Join us  

जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 6:09 AM

देवेंद्र फडणवीस डीसीएम आहेत याचा अर्थ ते डबल सीएम आहेत असे कौतुक आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जैन समाजामार्फत राबविण्यात येणारे सेवाकार्य, समाज म्हणून येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो आणि राहू अशी हमी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे एका सभेत दिली.

गोवालिया टँक येथील जैन संघात झालेल्या सभेला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा, दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव, आचार्य नयपद्मसागरजी, शायना एन. सी. आदी उपस्थित होते. जैन समाजाने महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी यावेळी केले. फडणवीस यांनी जैन समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, माझ्या एनर्जीचा स्रोत आचार्य नयपद्मसागरजी यांचा आशीर्वाद आहे. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्यासाठी जैन समाजाच्या भक्कम पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. प्रमोद सावंत यांनी जैन समाजाला गोव्यात त्यांच्या सरकारकडून केल्या जात असलेल्या सहकार्याबद्दल उल्लेख केला.

कांदा, बटाटा खात नाही

गेली दहा वर्षे आपण कांदा, बटाटा खात नाही. या अर्थाने आपण जैन समाजाच्या शिकवणुकीचे पालन करत असल्याचे यामिनी जाधव म्हणाल्या. जैन समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहू असे त्या म्हणाल्या.

डीसीएम म्हणजे डबल सीएम

देवेंद्र फडणवीस डीसीएम आहेत याचा अर्थ ते डबल सीएम आहेत असे कौतुक आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी केले. जैन समाजासाठी दक्षिण मुंबईत फडणवीस यांच्यामुळेच समाजाला भवनासाठी जागा मिळाली असे ते म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४प्रमोद सावंतदेवेंद्र फडणवीसलोकसभा निवडणूक २०२४