Join us  

नारायण राणेंची 'एनडीए'मध्ये एन्ट्री झाल्यास शिवसेना घेणार एक्झिट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 11:05 AM

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा एनडीएमध्ये समावेश झाल्यास तर शिवसेना बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, भाजपा नेत्यांमध्येही यामुळे अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे

मुंबई - ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा एनडीएमध्ये समावेश झाल्यास तर शिवसेना बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, भाजपा नेत्यांमध्येही यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे, अशी चर्चा आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर एखाद्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वत:चा नवा पक्ष काढणे, असे दोन पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय मी निवडला आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर बोचरी टीकादेखील केली. दरम्यान, नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ हा भाजपाप्रणित एनडीएमध्ये सहभाग होणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय, नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं मिळणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणेंना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खातं मिळण्याची शक्यता आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही दोन्ही खाती आहेत.  नारायण राणे यांना नेमकं कोणते खातं दिली जाणार, यावरुन भाजपा नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणेंना एखादे खाते दिले जात असताना आपल्याकडील महत्त्वाचे खाते काढून घेतले जाऊ नये, यासाठी भाजपा मंत्र्यांची धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे.  

शिवसेना हेच मुख्य लक्ष्य - नारायण राणेनारायण राणे यांनी रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवसेनेवर बोचरी टीका करत उद्धव ठाकरे हेच मुख्य लक्ष्य असतील, असेही राणेंनी स्पष्ट केले. ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या माझ्या पक्षाची राज्यघटनेशी अविचल बांधिलकी असेल. लवकरच पक्षाची नोंदणी करून झेंडा आणि निशाणी जाहीर करू. ‘सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीच आम्ही राजकारण करू आणि दिला शब्द पाळू’ हेच आमचे ब्रीदवाक्य असेल, असेही राणे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील पत्रकार परिषदेत सांगितले.शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत राणेंनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे ‘कुजके-नासके विचार’ होते, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव आणि शिवसेनाच आपले राजकीय विरोधक असतील, असे राणे म्हणाले. जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करता, मग सत्तेत गेलातच कशाला? काश्मीर आणि बिहारमध्ये भाजपा सत्तेसाठी लाचार झाल्याचा आरोप करणा-या उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लाचारी का पत्करली, असे सवालही राणे यांनी केले.

महत्त्वाचे प्रश्न... रालोआत जाणार का?- आताच पक्ष काढला आहे. निमंत्रण आले तर जाऊ, असे उत्तर राणे यांनी दिले.किती आमदार येणार?- आताच दुकान उघडल्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्ष दुकान उघडल्यावर कळेलच. त्यांची कमतरता नाही, असे राणे म्हणाले.

दिल्लीपर्यंत भीक मागूनही राणेंचे हात रिकामेच ! - शिवसेनेचा पलटवारभाजपामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजपा नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी केला. तर, भ्रष्टाचारी राणेंना शिवसेनेवर टीका करण्याचा अधिकारच नाही, असे सांगत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राऊत म्हणाले, राजकीय क्षेत्रात ‘आपल्याबरोबर दोघे फ्री’ ही ऑफर देत नारायण राणे फिरत होते. मात्र त्यांची ही ऑफर कोणीच स्वीकारली नाही. त्यामुळे त्यांना नाइलाजाने ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्ष काढावा लागला. ज्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही; स्वाभिमान कशाशी खातात, हे माहिती नाही, त्यांच्याकडून कोण काय अपेक्षा ठेवणार?

‘स्वाभिमान’ या शब्दाची त्यांनी विटंबनाच केली आहे. ‘स्वाभिमान’ या नावाने पक्ष काढण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही. उपकारांची परतफेड अपकाराने करायची दुसºयाच्या ताटामध्ये घाण करायची. कृतघ्नपणा करून राजकीय हैदोस घालायचा ही राणेंची संस्कृती आहे. ते ज्या पक्षात जातात तेथे भांड्याला भांडे लावत नाहीत तर भांडेच फोडून टाकतात. त्यामुळे भाजपाने त्यांना दूर ठेवले असावे, असा चिमटाही राऊत यांनी काढला. नवीन पक्षाची स्थापना केल्यानंतर राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावर शिवसेनेनं पलटवार केला आहे. 

टॅग्स :नारायण राणे शिवसेनाभाजपा