Join us

मारहाणीबाबत संजय गायकवाडांची चौकशी होणार की नाही? CM फडणवीस म्हणाले, “पोलीस योग्य ते करतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:52 IST

CM Devendra Fadnavis Vidhan Bhavan News: संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

CM Devendra Fadnavis Vidhan Bhavan News: शिंदेसेनेचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये तेथील कर्मचाऱ्याला गावगुंडाप्रमाणे बेदम मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर याबाबत अद्याप संजय गायकवाड यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, पोलीस योग्य कारवाई करतील, असे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झाल्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळेस पत्रकारांनी संजय गायकवाड यांच्याकडून झालेल्या मारहाणीबाबत प्रश्न विचारला. संजय गायकवाड यांच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल नसल्यामुळे त्यांची चौकशी करता येणार नाही, अशी भूमिका गृहराज्यमंत्र्यांनी घेतल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

पोलीस योग्य ती करवाई करतील

पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. पोलीस याची चौकशी करतील. यासाठी कुणाचीही तक्रार येण्याची गरज नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील. काही गुन्हे दखलपात्र असतात, काही अदखलपात्र असतात. त्यानुसार याबाबतची कारवाई होईल. शेवटी किती ताकद लावली गेली, याच्या आधारावर त्या गुन्ह्याचे स्वरूप ठरते. पोलिसांना कारवाई करू द्या. पोलीस योग्य कारवाई करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, आ. गायकवाड त्यांचा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जनसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सत्तेचा माज कसा असतो, हेच यातून पहायला मिळते, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार झाल्यासारखे वाटते, असे लोकांनी म्हटले आहे. ⁠आमदार जर खराब जेवणासाठी कॅन्टीनवाल्याला मारहाण करत असेल तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये? तसेच दुसरीकडे, रागाच्या भरात त्यांनी ते कृत्य केले; पण लोकप्रतिनिधी असताना कायदेशीर कारवाई करण्याचे आपल्याकडे अधिकार आहेत. मी गायकवाड यांना समज दिली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीससंजय गायकवाडमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३विधान भवन