पीडितेच्या बहिणीचा जबाब नोंदवणार
By Admin | Updated: July 5, 2014 03:59 IST2014-07-05T03:59:29+5:302014-07-05T03:59:29+5:30
आरोपी समीर विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. तीन महिन्यांपासून त्याची पत्नी मुलासह गावी निघून गेली.

पीडितेच्या बहिणीचा जबाब नोंदवणार
मुंबई : भांडुप येथे शेजारी राहणाऱ्या समीर घुगरे (३३) या तरुणाच्या अश्लील वर्तनाला कंटाळून १३ वर्षीय मुलीने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस पीडित मुलीच्या आठ वर्षीय बहिणीचा जबाब नोंदविणार आहेत. दरम्यान, ७५ टक्के भाजलेल्या मुलीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी समीर विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. तीन महिन्यांपासून त्याची पत्नी मुलासह गावी निघून गेली. महिनाभरापासून याच परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या मदतीने आरोपी पीडित मुलीला मोबाइलवर अश्लील क्लिप दाखवत तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची पीडित मुलीची सुसाइड नोट हाती लागल्याने हा प्रकार उघड झाला. पीडित मुलीसोबत आरोपी तिच्या लहान बहिणीला त्याचप्रकारे त्रास द्यायचा. तिनेही समीरच्या या विकृतीबाबत पोलिसांना सांगितले आहे. पीडित मुलगी सातवीत शिकते. १ जुलैला सायंकाळी तिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. तिला मुलुंड अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला सायन रुग्णालयात हलवले. गरम पाणी पिण्यासाठी गॅस पेटविला असता त्याचा भडका उडून भाजल्याचे तिने सांगितले होते. पोलिसांना घटनास्थळी रॉकेलचा वास येत असल्याने त्यांना संशय आला.