Join us

देशात तिरस्कार पसरू देणार नाही; संस्था, संघटनांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 06:34 IST

आझाद मैदानात मोर्चा। एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग

मुंबई : देशात भाजप सरकार येण्यापूर्वी सर्व काही ठीक होते. हिंदू, मुस्लीम बांधव एकोप्याने राहात होते. पण भाजप सरकार सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्टÑीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर)च्या माध्यमातून देशात तिरस्काराची भावना पसरवत आहेत, पण त्यांना तिरस्कार पसरू देणार नाही असा निर्धार विविध संस्था, संघटनांनी शनिवारी आझाद मैदानात केला.

सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधातील या मोर्चात ६५ संघटनांनी सहभाग घेतला होता तर, एक लाखाहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी ‘संविधान बचाव, भारत बचाव’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. मोर्चात सहभागी झालेल्या मौलाना अजीज जलील यांनी सांगितले की, सरकार देशात तिरस्काराची भावना वाढवत आहे. याचे उत्तर आम्हाला तिरस्काराने नाही तर प्रेमाने द्यायचे आहे. राज्यकर्ते माघार घ्यायला तयार नाहीत, पण आमचा निर्धारही पक्का आहे. काहीही झाले तरी माघार घेणार नाही.तर, मागासवर्गीयांवर काही वर्षांपूर्वी अन्याय होत होता, आज त्याची पुनरावृत्ती होत आहे. देशात नवे कायदे आणले जात असून त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे, अशी खंत अ‍ॅड. राकेश राठोड यांनी व्यक्त केली.

मैदानात कार्यकर्त्यांची गर्दी

आझाद मैदान येथे शनिवारी दुपारी १ पासून विविध संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. मोर्चात आंदोलकांनी तिरंगा, भगवा, निळे झेंडे आणले होते. मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचे सदरे परिधान केले होते. महिलांची संख्याही लक्षणीय होती. चारच्या सुमारास मैदानात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. पोलीस बंदोबस्त व स्वयंसेवकांमुळे शिस्त, शांततेत मोर्चा पार पडला.महाविकास आघाडीचे काही ज्येष्ठ नेतेही मोर्चात सहभागी होणार होते. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उर्जामंत्री नितीन राऊत यांसह राष्टÑवादी किंवा शिवसेनेचा एकही नेता मोर्चात सहभागी झाला नाही. 

वाहतुकीत बदलया मोर्चामुळे सायंकाळी साडेपाच वाजता महापालिका मार्ग (मेट्रो आणि सीएसएमटी दरम्यान) ते महात्मा गांधी रोड (मेट्रो आणि हुतात्मा चौक), हजारीमल सोमाणी मार्ग (हुतात्मा चौक ते सीएसएमटी ) हे मार्ग बंद ठेवण्यात आले होते. वाहतुकीत बदल करून येथील बेस्ट बस क्रमांक ६१आणि ६६ या एलटी मार्ग, डी.एन. रोडवरून वळविण्यात आल्या होत्या.बस जाळू नका, केवळ बत्ती जाळासीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. प्रत्येक नागरिकाला शांतीपूर्ण मार्गानेआंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण आंदोलनादरम्यान यापूर्वी बस जाळण्यात आली, ते चुकीचे आहे. बस जाळणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. हात जोडून दिल्लीत जळालेल्या बसला श्रद्धांजली वाहा. आज निष्पापांचा बळी घेतला जात आहे. कित्येकांची डोकी फोडली जात आहेत, काही जणांना गोळ्या घातल्या जात आहेत. काहीही झाले, तरी हिंसक होऊ नका, बस जाळू नका. केवळ बत्ती जाळा. कारण माणसांची संख्या जास्त असून, बसची संख्या कमी आहे, असे आवाहन मोर्चात सहभागी झालेल्या अभिनेता सुशांत सिंग याने केले.

टॅग्स :मुंबईनागरिकत्व सुधारणा विधेयक