Join us  

‘संविधानाला धक्का पोहोचू देणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 5:07 AM

ओबीसी संमेलनात निर्णय; छगन भुजबळ, महादेव जानकर यांची उपस्थिती

मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता ओबीसी समाजाला एकत्र करण्यासाठी आॅल इंडिया मुस्लीम ओबीसी संघटनेने मुंबईत आयोजित केलेल्या संविधान सन्मान संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. माजी उपमुख्यमंत्री, महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, राज्याचे पशुसंवर्धनमंत्री व धनगर समाजाचे नेते महादेव जानकर, आॅल इंडिया मुस्लीम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्यासहित मोठ्या संख्येने ओबीसी समुदाय या वेळी उपस्थित होता.बिर्ला मातुश्री सभागृहात नुकतेच हे संमेलन पार पडले. ओबीसी समाजाला निवडणुकीत पुरेसे प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय हा समाज निवडणुकीत मदत करणार नाही, असा इशारा देण्यात आला. देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून संविधान चुकीच्या हातात गेले असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. संविधान वाचले तर देश वाचेल. त्यामुळे देश वाचवण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्यामधील मतभेद दूर ठेवून देशहितासाठी एकत्रित येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.शब्बीर अन्सारी म्हणाले, देश चालण्यासाठी संविधानाची गरज आहे. विद्यमान सत्ताधारी संविधानाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र संविधानाच्या चौकटीला धक्का लागता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोणी कितीही प्रयत्न केले तरी संविधानाच्या चौकटीला धोका पोहोचू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. मुस्लीम ओबीसींना हिंदू ओबीसीप्रमाणे लाभ मिळत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

टॅग्स :छगन भुजबळमहादेव जानकरभाजपा