Join us  

या वर्षी मुंबई तुंबणार?; डेडलाइन संपण्यास उरले चार दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:46 AM

पावसाळापूर्व कामे अर्धवट

मुंबई : मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन संपण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र पावसाळ्याआधी करण्यात येणारी अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या कापणे अशा कामांचा समावेश आहे. तसेच नाल्यांची सफाईही अर्धवट असल्याने पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होण्याचा धोका विरोधी पक्षनेते यांनी पालिका आयुक्तांकडे व्यक्त केला आहे.

एप्रिल महिन्यापासून मान्सूनपूर्व कामाची सुरुवात होते. या दोन महिन्यांत धोकादायक वृक्षांच्या फांद्या तोडणे, रस्त्यांची दुरुस्ती, उघड्या गटारांवर झाकण लावणे, नाल्यांची सफाई अशी कामे केली जातात. यासाठी ३१ मेची डेड लाइन निश्चित करण्यात येते. परंतु या वर्षी मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळापूर्व कामे लांबणीवर पडली, नालेसफाईच्या कामांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. मात्र रस्ते दुरुस्ती, धोकादायक झाडांच्या फांद्या कापणे अशी कामे रखडली आहेत.

यावर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळा सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पावसाळापूर्व कामांची डेडलाइन संपण्यास अवघे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रशासनाने स्वत: या कामाचा आढावा घेऊन कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली आहे.पावसाळी कामे पूर्ण न झाल्यास यंदा मुंबईकरांचे हाल निश्चित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.च्नाल्यांमधून गाळ न काढल्यास पावसाळ्यात नाले भरून वाहतात आणि आसपासच्या भागांमध्ये पाणी तुंबते, असा अनुभव आहे. यावर्षी नालेसफाईचे काम उशिरा सुरू झाल्याने ते अपूर्ण आहे, असा आरोप नगरसेवक करीत आहेत.

टॅग्स :पाऊसमुंबईमुंबई महानगरपालिका