Join us  

नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न सुटणार का? - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 8:08 AM

नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात.

मुंबई - नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. राजकारणात व एकंदरीत समाजातच असहिष्णुता वाढत आहे व लोक मुद्दय़ांवरून गुद्यांवर येत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे पंतप्रधान मोदी यांनीही नेमके याच मुद्दय़ांवर बोट ठेवले. मला पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे असे मोदी म्हणाले. त्या आधी ते एकदा असेही म्हणाले होते की मला खतम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. पंतप्रधानांना असे वाटावे हे काही बरोबर नाही असं सामना अग्रलेखातून म्हणण्यात आलं आहे. 

आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काही दिवसांपूर्वी प्रचारावेळी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावर सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. 

सामना संपादकीयमधील महत्त्वाचे मुद्देकेजरीवाल यांना थप्पड का पडली? याचे उत्तर त्यांच्याच नेत्यांनी दिले, पण आम्ही या प्रकाराशी सहमत नाही. केजरीवाल यांच्या सुरक्षेत कोणतीही फट राहता कामा नये. एखाद्या माणसाने किती थपडा खाव्यात याला काही मर्यादा आहे की नाही?

अरविंद केजरीवाल यांनी गेल्या चार वर्षांत जेवढय़ा ‘थप्पड’, ‘चपला’ खाल्ल्या आहेत तो एक विक्रमच म्हणावा लागेल. केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत व लोकशाही मार्गाने ते निवडून आले आहेत. ते कुणाला नको असतील तर त्यांचा पराभव त्याच मार्गाने करावा लागेल. मारहाण करणे हा मार्ग नाही. 

राजकीय नेत्यांना जाहीरपणे अपमानित करण्याचे प्रकार थांबायला हवेत. शरद पवार यांच्या बाबतीत हा असलाच घाणेरडा प्रकार दिल्लीत झाला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

नेत्यांवर चपला, बूट, शाई फेकून देशातील प्रश्न खरंच सुटणार आहेत काय? संताप व्यक्त करण्यापुरते हे प्रकार मान्य, पण शेवटी संयमाचा बांध फुटतो व हे नको ते प्रकार घडतात. 

अरविंद केजरीवाल यांच्यावर आतापर्यंत 12 वेळा असे हल्ले झाले आहेत. कधी अंडे मारले. कधी मिरची पावडर, चपला, शाई फेकली. थपडाही लगावल्या. केजरीवाल हे तिखट बोलतात हे ठीक, पण ते बेलगाम बोलतात. 

दिल्लीत त्यांच्या ‘आप’ने भाजप तसेच काँग्रेसचा दारुण पराभव केला व सत्तेवर आल्यापासून ते केंद्र सरकार व प्रशासनाशी झगडत आहेत. दिल्लीस पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून त्यांना मुख्यमंत्री म्हणून अमर्याद अधिकार हवे आहेत. म्हणजे दिल्लीस स्वतःचे गृहमंत्रालय व पोलीस बळ हवे. ते शक्य नाही. दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने ते शहर कमालीचे संवेदनशील आहे. 

शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा वगैरे ठीक, पण दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राकडे असणे गरजेचे आहे. केजरीवाल यांना ते मान्य नाही व सरकारशी रोज संघर्ष करून ‘थपडा’ खात आहेत. 

केजरीवाल सरकारने शिक्षण व आरोग्य क्षेत्रांत चांगले काम केले. त्यांनी सरकारी शाळांचा दर्जा सुधारला व मोहल्ला क्लिनिकने गरीबांची सोय केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पण त्यांना मधल्या काळात पंतप्रधान पदाचीच स्वप्नं पडू लागली व त्याच भ्रमिष्ठ अवस्थेत केंद्र सरकारवर बेलगाम आरोप सुरू केले.  

टॅग्स :शिवसेनाअरविंद केजरीवालनरेंद्र मोदी