Join us  

'कोरोनाचे सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू', मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची भूमिका; मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 4:20 PM

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी गणेशमुर्तींच्या उंचीची मर्यादा नसावी अशी ठाम भूमिका घेतली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी गणेशोत्सवावर राज्य सरकारनं निर्बंध घातले होते. त्यात गणेशमुर्तींच्या उंचीवरही मर्यादा घालण्यात आली होती. पण यावेळी मुंबईतीलगणेशोत्सव मंडळांनी गणेशमुर्तींच्या उंचीची मर्यादा नसावी अशी ठाम भूमिका घेतली आहे. "कोरोना संबंधिचे सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उचंच आणू", असा पवित्रा मुंबईतील गणेश मंडळांनी घेतला आहे. 

गेल्यावर्षी गणेश मुर्तीकारांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळे यावेळी राज्य सरकार मदत करेल आणि गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधन येणार नाहीत अशी अपेक्षा मंडळांनी केली आहे. मूर्तीच्या उंचीसह उत्सवाच्या संभाव्या नियमावलीबाबत चर्चा करण्यासाठी गणेश मंडळे, गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई महापालिका आणि पोलिसांची लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

यंदाच्या वर्षात १० सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. उत्सवाला अडीच महिने असले तरी मूर्ती, मंडप, सजावटीची तयारी आतापासूनच करावी लागते. त्यामुळे सरकार आणि पालिकेनं भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करणं गरजेचं असल्याचंही मंडळांनी म्हटलं आहे. अद्याप कोणतीही भूमिका सरकारनं न घेतल्यानं मंडळं देखील संभ्रमात आहेत. 

राज्यात आता हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. विविध शहरांमधील पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी झाला आहे. तिसऱ्या लाटेची भीती आहे. पण नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी मंडळांची आहे. यात मूर्तीच्या उंचीची मर्यादा सरकारनं घालू नये, अशी मागणी गणेश मंडळांनी केली आहे. 

गणेश मंडळांनी केलेल्या सूचना कोणत्या?

  • गणेश मूर्तींसाठी उंचीची मर्यादा नसावी. 
  • मंडप, ध्वनिक्षेपक परवाने ठरलेल्या धोरणानुसार वितरित करावेत.
  • पीओपीच्या वापराबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा
  • दर्शनासाठी सुरक्षेचे नियम पाळून परवानगी द्यावी. 
  • आगमन, विसर्जन मिरवणुकीबाबत धोरण निश्चित केले जावे. 
  • चौपाट्या विसर्जनासाठी खुल्या कराव्यात.
  • मंडळाच्या जागेत लसीकरणाला परवानगी द्यावी. 
  • मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत.
टॅग्स :गणेशोत्सवमुंबईउद्धव ठाकरे