प्रायोगिक रंगभूमीला जागा मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:07 AM2018-06-11T06:07:14+5:302018-06-11T06:07:14+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान, आमचे प्राधान्य नाट्यसंमेलन भरविण्याला असेल, असे सांगणाऱ्या नाट्यपरिषदेच्या नव्या कार्यकारिणीने १३ ते १५ जून या कालावधीत हे संमेलन मुलुंड येथे आयोजित केले आहे.

 Will the experimental stage get space? | प्रायोगिक रंगभूमीला जागा मिळणार का?

प्रायोगिक रंगभूमीला जागा मिळणार का?

Next

- राज चिंचणकर
मुंबई  - अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान, आमचे प्राधान्य नाट्यसंमेलन भरविण्याला असेल, असे सांगणाऱ्या नाट्यपरिषदेच्या नव्या कार्यकारिणीने १३ ते १५ जून या कालावधीत हे संमेलन मुलुंड येथे आयोजित केले आहे. या संमेलनात एकुलते एक प्रायोगिक नाटक सादर केले जाणार आहे. हे पाहता, नाट्यसंमेलनात जाऊ द्या; परंतु नाट्यपरिषदेचे हक्काचे नाट्यगृह असलेल्या यशवंत नाट्यसंकुलात तरी प्रायोगिक रंगभूमीला निश्चित स्थान मिळणार का? अशी चर्चा नाट्यवर्तुळात रंगली आहे.
नाट्यसंमेलनाच्या याच कालावधीत, नाट्याचार्य गो. ब. देवल यांची स्मृती म्हणून दरवर्षी नाट्यपरिषदेतर्फे १४ जून रोजी आयोजित करण्यात येणारा सोहळा पार पडणार आहे. यात जीवनगौरव पुरस्कारांसह नाट्यक्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेल्या मान्यवरांचा सन्मान केला जातो. यंदा हा सोहळा म्हणजे नाट्यसंमेलनाचाच एक भाग असेल. वर्ष २००७मध्ये, हाच १४ जूनचा सोहळा यशवंत नाट्यगृहात रंगला असताना नाट्यगृहाच्या आवारात, बाहेर धो-धो कोसळणाºया पावसात ज्येष्ठ रंगकर्मी दामू केंकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक बुजुर्ग रंगकर्मींनी, यशवंत नाट्यसंकुलात प्रायोगिक रंगभूमीसाठी जागा मिळावी, म्हणून मागणी लावून धरली होती. त्या वेळी प्रायोगिक रंगभूमीकडे पाहण्याची, व्यावसायिकतेची झूल पांघरलेल्यांची अनास्था बघून उपस्थित रंगकर्मी व नाट्यरसिक हळहळले होते. मात्र, एकूणच या विषयावर नाट्यपरिषदेने अद्याप काही हालचाल केल्याचे दिसून येत नाही. नाट्यपरिषदेची नवीन कार्यकारिणी तरी याबाबत काही करेल का, याकडे समस्त प्रायोगिक रंगकर्मी व रसिकांचे आता लक्ष लागून राहिले आहे.
अलीकडेच, यशवंत नाट्यगृहात दामू केंकरे, विजय तेंडुलकर व सुधा करमरकर यांच्या छायाप्रतिमांचे अनावरण करण्यात आले. त्या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी प्रायोगिक रंगभूमीच्या जागेविषयी सकारात्मक सूतोवाच केले आहे; पण ते वास्तवात कधी येईल, याची प्रायोगिक रंगकर्मी वाट पाहत आहेत. या विषयाचे घोंगडे भिजत न पडता, निदान मुलुंडच्या नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून तरी, यशवंत नाट्यसंकुलात प्रायोगिक रंगभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याविषयी घोषणा होईल, अशी अपेक्षा प्रायोगिक रंगकर्मींकडून व्यक्त होत आहे.

Web Title:  Will the experimental stage get space?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.