Join us  

वेध विधानसभेचा - सत्तासंघर्षावर युतीचा उतारा चालणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 2:37 AM

मतभेदाचा फटका बसण्याची चिन्हे : मराठी मतदारांची मते निर्णायक

मतदारसंघ : मागाठाणे

मुंबई : २७६ मतदानकेंद्रे असलेला मागाठाणे हा उत्तर मुंबईतला चार मराठी बहुल विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. विविध भाषिकांच्या या बहुढंगी मतदारसंघावर निर्णायक भूमिकेत मात्र मराठी मतदार पाहायला मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंनी मागाठाणेच्या गडावर सेनेचा भगवा फडकवण्यात यश मिळविले होते. मागाठाण्यातील मुख्य सत्तासंघर्ष भाजप आणि शिवसेनेतच असून, युती होणार की नाही, यावर या सत्तासंघर्षाची मोठी भिस्त असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मागाठाणे विधानसभा मतदारसंघ म्हणजे केतकीपाडा, अशोकवन, दामूनगर, तसेच श्रीकृष्णनगर, अभिनव, रहेजा, गुलमोहर, टाटा पॉवर, राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ते नव्याने उदयाला आलेले ठाकूर व्हिलेज असा पसरलेला आहे. मराठीच्या मुद्द्यावर येथील मतदारांनी नेहमीच उमेदवारांना साथ दिली आहे. त्यामुळे येथे जसे मनसेचे प्रवीण दरेकर २००९ मध्ये निवडून आले, तशीच शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंनी २०१४ मध्ये बाजी मारली. २०१४ मध्ये या मतदारसंघात ५२.७१ टक्के मतदान झाले होते.

एकीकडे राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती होईल का, यावर चर्चा सुरू असतानाच मागाठाण्याच्या विकासात मागील ५ वर्षांत कमालीची पीछेहाट झाली असल्याचा दावा करत भाजपच्या वतीने अप्रत्यक्ष ‘एकला चलो रे’चा प्रचार करण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे. हा संघर्ष विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि मनसेतून भाजपमध्ये प्रवेश झालेल्या विधानपरिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांतील असल्याचे उघड आहे. त्यामुळे युती झालीच, तर आता उघडपणे एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्यांवर शांतपणे माघार घ्यायची वेळ येणार आहे, यात वाद नाही. कारण सत्तेच्या या संघर्षात युतीच्या उमेदवाराला फटका बसला, तर त्याचे पडसाद नक्कीच त्या उमेदवाराच्या पुढील वाटचालीवर होण्याची शक्यता आहे.

३ लाखांच्या आसपास मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात अस्वच्छता, गढूळ पाण्याचा प्रश्न, रस्त्याची, सुशोभीकरणाची अर्धवट सोडून दिलेली कामे यामुळे येथील रहिवासी त्रस्त आहेत. मागाठाण्यात वनजमिनीवर शेकडो झोपड्या आहेत. केतकीपाडा, दामूपाडा, गौतमनगर येथील या झोपडपट्ट्यांचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या झोपडपट्ट्यांमधील राहणीमान, शिक्षण, आरोग्य हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंनी ६५,०१६ मतांनी आपला विजय अधोरेखित केला होता, तर त्याच्या आधी आमदार असलेल्या मनसेच्या प्रवीण दरेकरांना ३२,०५७ मते मिळवीत, तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर, ते भाजपवासी झाले. २०१४ साली भाजपकडून निवडणूक लढविलेल्या रतिलाल मेहता यांनी सुर्वेनंतरची आघाडी घेत ४४,६३१ मते मिळविली होती. काँग्रेसच्या सचिन सावंतांना १२,२०२ तर राष्ट्रवादीच्या सचिन शिंदेंना २,६९७ मतावर समाधान मानावे लागले होते. २०१४ मध्ये या मतदारसंघात १,८६२ मतदारांनी आपला नोटाचा हक्क बजावला होता.लोकसभेच्या निवडणुकीत युतीचा फायदा गोपाळ शेट्टींना झाला यात वाद नाही. त्यावरून उत्तर मुंबईतील या मराठी बहुल विधानसभा मतदारसंघातही भाजपचा प्रभाव कायम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना आणि मागाठाणेमध्ये शिवसेनेचा आमदार आणि नगरसेवक असतानाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विनोद तावडे आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सहकार्यामुळे मागाठाणे मतदार संघात दुप्पट प्रमाणात विकासकामे केली असल्याचा दावा करणाºया प्रवीण दरेकरांना विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचा पक्ष कसे हाताळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.उद्याच्या अंकात - अंधेरी (प) 

टॅग्स :मुंबईशिवसेनाभाजपा