Join us  

घाटकोपर पश्चिम मतदारसंघात भाजपचा झेंडा कायम राहणार की सत्तापालट होणार?  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 2:20 AM

भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन, भाजपचे आमदार राम कदम, भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे या चार मोजक्या नावांनी घाटकोपर पश्चिम विधानसभा गाजवली आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन, भाजपचे आमदार राम कदम, भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे या चार मोजक्या नावांनी घाटकोपर पश्चिम विधानसभा गाजवली आहे. नुसतीच गाजवली नाही तर पक्षांतर्गत कलह, राजकीय गटबाजी, प्रतिस्पर्ध्यांची राजकीय खेळी आणि मग मतदारराजाचा कौल; या प्रमुख घटकांचा फटका या चारही नावांना यापूर्वी बसला आहे. विशेषत: राम कदम, दिलीप लांडे आणि किरीट सोमय्या या तीन नावांमुळे घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्राचे राजकारण ढवळून निघाले असून, येत्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपचाच झेंडा कायम राहणार की सत्तापालट होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील राम कदम हे खरे तर चर्चेत आले ते दहीहंडीमुळे. कदम यांनी त्यांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याची घोषणा केली. तेव्हापासून म्हणजे दहा एक वर्षांपासून चर्चेत राहिलेले राम कदम आजही चर्चेत आहेत. केवळ कदम नाही तर आता भाजपच्या खासदार असलेल्या पूनम महाजन यांनीदेखील २००९ साली घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली होती. आणि गमतीशीर बाब म्हणजे तेव्हा विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिममधून पूनम यांचे प्रतिस्पर्धी कोण होते? तर ते होते राम कदम. कदम तेव्हा मनसेत होते. कदम यांनी तेव्हा पूनम यांचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर काही वर्षांत कदम यांनी मनसे सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आज पूनम आणि राम कदम दोघेही एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये आहेत. पूनम खासदार तर कदम आमदार आहेत.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम विधानसभेतून भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम यांना घाटकोपर पश्चिममधून उमेदवारी मिळाली; आणि येथील स्थानिक नेत्यांचा हिरमोड झाला होता. येथील राजकीय गटबाजी येथेच थांबली नाही तर पुढे वाढतच राहील.घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे दिलीप लांडे. लांडे आता शिवसेनेत आहेत. हेच लांडे एके काळी मनसेत होते. लांडे यांनी २००९ साली मनसेतून चांदिवली विधानसभेतून काँग्रेसचे नसीम खान यांच्या विरोधात दंड थोपटले होते. लांडे यांनी ४८ हजार ९०१ मते मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. पण लांडे यांनी हार मानली नाही. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत लांडे यांनी घाटकोपर पश्चिममधून आपले नशीब अजमावले. तेव्हाही ते मनसेतच होते. येथे त्यांना अवघी १७ हजार २०७ मते मिळाली होती. त्यानंतर काही वर्षांतच लांडे पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. आणि राजकीय चर्चेनुसार लांडे आता पुन्हा चांदिवली विधानसभेतून इच्छुक आहेत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच मनसेतून २००९ साली घाटकोपर विधानसभा लढलेल्या कदम यांनी २०१४ साली मात्र भाजपकडून उमेदवारी मिळवत पुन्हा विजय संपादन केला. २००९ साली घाटकोपर पश्चिममधून पराभूत झालेल्या भाजपच्या पूनम महाजन यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपले नशीब अजमावले आणि त्यांचा विजय झाला. २०१९ सालीही पूनम याच लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. याच मतदारसंघातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे २००९ साली येथून आमदारकीसाठी इच्छुक असलेले किरीट सोमय्या १९९९ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी उत्तर पूर्व मुंबई लोकसभेतून भाजपचे खासदार झाले होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा पराभव केला होता.२००४ साली चक्रे उलटी फिरली आणि कामत यांनी सोमय्या यांचा पराभव केला. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सोमय्या यांचा पराभव झाला; आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांचा विजय झाला. २०१४ सालच्या लोकसभेवेळी पुन्हा चक्रे उलटी फिरली; आणि सोमय्या यांचा विजय तर पाटील यांचा पराभव झाला. २०१९ सालच्या लोकसभेदरम्यान शिवसेनेने खेळलेल्या राजकीय खेळीमुळे भाजपने सोमय्या यांच्याऐवजी नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. आणि कोटक जिंकलेसुद्धा. घाटकोपर पश्चिम येथील विधानसभेचे राजकारण भाजप, मनसे आणि शिवसेना या तीन पक्षांभोवती फिरते. या वेळी हे तिन्ही पक्ष सक्रिय असून, कोण बाजी मारते याकडे सर्वांचेच लक्ष आहे. २००९ विधानसभा निवडणुकीवेळी घाटकोपर पश्चिम विधानसभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राम कदम हे मैदानात उतरले होते. राम कदम यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे पूनम महाजन यांनी दंड थोपटले होते. मात्र पूनम यांचा घाटकोपर पश्चिम विधानसभेतून पराभव झाला होता तर राम कदम हे विजयी उमेदवार होते. कदम यांना ६० हजार ३४३ मते प्राप्त झाली होती. महाजन यांना ३४ हजार ११५ मते प्राप्त झाली होती. कदम यांनी २६ हजार २२८ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला होता.२०१४ विधानसभा निवडणुकीवेळी घाटकोपर पश्चिम विधानसभेतून भारतीय जनता पक्षातर्फे राम कदम यांना उमेदवारी मिळाली. तर शिवसेनेने सुधीर मोरे यांना उमेदवारी दिली. या वेळी राम कदम यांना ८० हजार ३४३ मते मिळाली. सुधीर मोरे यांना ३८ हजार ४२७ मते मिळाली. साहजिकच या वेळीही राम कदम यांचा विजय झाला. या वेळी कदम यांनी तब्बल ४१ हजार ९१६ मतांची आघाडी घेतली होती आणि विजय संपादन केला होता.

टॅग्स :भाजपाघाटकोपर पश्चिम