विधान भवन स्थानक होणार
By Admin | Updated: January 18, 2015 01:04 IST2015-01-18T01:04:22+5:302015-01-18T01:04:22+5:30
मेट्रो विधान भवन स्थानकाजवळील राजकीय पक्षांची कार्यालये स्थलांतरित करण्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दिले आहे.

विधान भवन स्थानक होणार
मेट्रोसाठी पक्ष कार्यालयांचे स्थलांतर : राजकीय पक्षांचे नेते सकारात्मक
मुंबई : मेट्रो विधान भवन स्थानकाजवळील राजकीय पक्षांची कार्यालये स्थलांतरित करण्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दिले आहे. याबाबत ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ने दिलेल्या नोटिसांना उत्तर देताना हे आश्वासन देण्यात आले आहे. शिवाय स्थानकाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी पर्यायी जागा शोधण्यास मदत करण्याचेही आश्वासन संबंधितांनी दिले आहे. १ मेपर्यंत राजकीय पक्षांची कार्यालये स्थलांतरित करण्याचा प्रयत्न होणार आहे.
राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या बैठकीत ही आश्वासने देण्यात आली आहेत. मेट्रो विधान भवन स्थानकाजवळ एकूण २६ सरकारी आणि ८ राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या स्थलांतरासाठी महानगर टेलीफोन निगम लिमिटेड, भारत संचार निगम लिमिटेड, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि वर्ल्ड टे्रड सेंटर ही कार्यालये पर्यायी जागा म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुचवली आहेत. काही पक्ष कार्यालयांनी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी या इमारती दाखविण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.
राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये साधारणपणे सर्वसामान्य नागरिक येत असतात. त्यामुळे ही कार्यालये शक्यतो मंत्रालयाजवळ असावीत, यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सामान्य प्रशासन विभागाद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला १४ सरकारी आणि ६ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय रिपब्लिकन पार्टी, समाजवादी पार्टी, शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश
होता. (प्रतिनिधी)
राजकीय पक्षांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद स्वागतार्ह आहे. आता कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो मार्ग अपेक्षित गतीने पूर्ण होईल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भडे यांनी वर्तवला आहे.