वन्यजीव संरक्षक संस्था उपेक्षितच

By Admin | Updated: January 6, 2015 22:04 IST2015-01-06T22:04:09+5:302015-01-06T22:04:09+5:30

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजिवांचे संरक्षण आवश्यक आहे. वन्यजिवांच्या बेसुमार हत्यांमुळे जंगले ओसाड होत चालली आहेत.

Wildlife conservatory institution ignored | वन्यजीव संरक्षक संस्था उपेक्षितच

वन्यजीव संरक्षक संस्था उपेक्षितच

मधुकर ठाकूर ल्ल उरण
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजिवांचे संरक्षण आवश्यक आहे. वन्यजिवांच्या बेसुमार हत्यांमुळे जंगले ओसाड होत चालली आहेत. त्यामुळे विविध प्रकारातील आकर्षक वन्यजिवांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. याचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने आता गावोगावी वन्यजीव संरक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. शासनाची कोणतीही मदत नसतानाही वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून या संस्था आणि त्यांच्या सदस्यांकडून वन्यजिवांचे रक्षण केले जाते.
रायगड जिल्ह्यात अनेक वन्यजीव संरक्षण संस्था कार्यरत आहेत. वन्यजीव संस्थांच्या सदस्यांनी विविध प्रकारातील लाखो दुर्मीळ वन्यजिवांचे प्राण वाचविले आहेत. मात्र शासनाकडून या संस्थांना कोणतीही मदत मिळत नसल्याचे संस्थेतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
रायगड जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून एकेकाळी याठिकाणी विविधरंगी आकर्षक पशू-पक्षी, प्राण्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य होते. मात्र विकासाची गंगा आली आणि विकासाच्या नावाखाली डोंगर, दऱ्या भुईसपाट झाल्या. प्रचंड प्रमाणात बेसुमार वृक्षतोड झाली.
वाढत्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलामुळे दुर्मीळ पशू-पक्ष्यांची वास्तव्याची आश्रयस्थाने नष्ट झाली. या कठीण परिस्थितीमुळे दुर्मीळ पशू-पक्षी, प्राणी नागरी वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये येणाऱ्या पशू-पक्षी, प्राण्यांच्या नागरिकांशी चकमकी घडू लागल्या.
वन्यजिवांच्या घटत्या संख्येचे दुष्परिणाम निसर्गावर दिसू लागले आहेत. याची जाणीव झाल्याने निसर्ग, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच दुर्मीळ पशू-पक्षी प्राण्यांच्या नामशेष होऊ पाहणाऱ्या जाती अस्तित्वात ठेवण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायदा अमलात आणला आहे. सध्या रायगड जिल्ह्यात अनेक संस्था करताना दिसू लागल्या आहेत. शासनाचे कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसतानाही जिवावर उदार होवून या संस्था वन्यजिवांच्या रक्षणाचे काम करताना दिसत आहेत. यामध्ये अनेक वन्यजीव संस्था आघाडीवर आहेत.
रात्री-अपरात्री येणाऱ्या एका फोनवर हे वन्यजीव व सर्पमित्र सदस्य तात्काळ घटनास्थळी धाव घेतात. जिवावर बेतेल याची पर्वा न करताच विषारी, बिनविषारी साप सर्पमित्र आपले कसब पणाला लावून पकडतात आणि पुन्हा सुरक्षितरीत्या जंगलात सोडतात.
जीव धोक्यात घालून कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता वन्यजीव वाचविण्याचे काम या संस्था करीत आहेत.

ओळखपत्रांची मागणी
४गेल्या पाच वर्षांत या वन्यजीव संस्थांनी लाखो दुर्मीळ वन्यजिवांचे प्राण वाचविले आहेत. त्यामध्ये सापांची संख्या सर्वाधिक आहे.
४वन्यजिवांच्या संरक्षणाबरोबरच या संस्था वन्यजीव व मानवी जीवनातील सापांचे असलेले महत्त्व पटवून देण्यासाठी ठिकठिकाणच्या नागरी वस्त्या, आदिवासी वाड्यांमध्ये सर्प प्रदर्शने भरवून प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती करण्याचे मौलिक कामही या वन्यजीव संस्था करीत आहेत.
४जिवावर उदार होवून वन्यजीव वाचविण्याचे काम करणाऱ्या अशा संस्थांना शासनाची कोणतीच मदत नाहीच. वन्यजिवांच्या संरक्षणाचा ध्यास घेणाऱ्या वन्यजीव संस्थांच्या सदस्यांना शासनाने किमान ओळखपत्रे द्यावीत, अशी माफक अपेक्षा या संस्थांची आहे.

Web Title: Wildlife conservatory institution ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.