Join us

कोस्टल रोडच्या दोन खांबांतील अंतर वाढवले; कोळी बांधवांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:09 IST

कोस्टल रोडच्या बांधकामासंदर्भात वरळी कोळीवाड्यातील स्थानिक नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क    मुंबई : वरळी काेळीवाड्यातील कोस्टल रोडच्या दोन खांबांमधील अंतर वाढविण्यात यावे अशी मागणी स्थानिक कोळी बांधवांकडून करण्यात येत होती. त्यांची ही मागणी सरकारने मान्य केली असून वरळीच्या समुद्रातील कोस्टल रोडच्या दोन खांबांतील अंतर ६० मीटरवरून १२० मीटर करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. कोळी बांधवांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

कोस्टल रोडच्या बांधकामासंदर्भात वरळी कोळीवाड्यातील स्थानिक नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. मच्छीमारीला अडचण येऊ नये यासाठी कोस्टल रोडच्या दोन खांबांतील अंतर वाढवावे. खांब क्रमांक ७ आणि ९ दरम्यानचा खांब क्रमांक ८ हटवावा, अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात तत्काळ एक समिती स्थापना केली होती. त्यानंतर वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत स्थानिक मच्छीमार समितीची बैठक झाली. 

बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, वरळी कोळीवाड्यातील नागरिकांना न्याय देण्यात येईल. दोन खांबांतील अंतर १२० मीटर करण्यात येईल.  तिथले ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, आता बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. यामुळे जो वाढीव खर्च मंजूर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.