- अशोक दातार(वाहतूकतज्ज्ञ)
मोनो रेलच्या उद्घाटनाच्या दिवशी तिच्यातून प्रवास केला होता. त्याआधी क्वालालंपूरला असताना २०१० मध्येही मोनो प्रवास केला होता. मोनोचा हा प्रवास साधारण होता, मात्र भारत आणि जगातील इतर देशांतील मेट्रोच्या तुलनेत तो सुखद नव्हता. मोनोचा प्रवास कधीच डळमळल्याशिवाय होत नाही, अशी अनेक प्रवाशांचीही तक्रार आहे. हे आवर्जून सांगण्याचे कारण मुसळधार पाऊस कोसळत असताना चेंबूर स्थानकाजवळ घडलेली १९ ऑगस्टची दुर्घटना. त्यावेळी परिस्थितीत अत्यंत धोकादायक होती.
रस्ते आणि हार्बर मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे प्रवासी मोनोरेलकडे धावले. पहिल्यांदाच मोनोवर ओव्हर क्राऊड झाला. ती अधांतरी अडकली तेव्हा ५८२ प्रवाशांनी खचाखच होती. तिच्या क्षमतेपेक्षा प्रवाशांचे प्रमाण १२ ते १५ टक्के जास्त होते. ही अतिरिक्त संख्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचारात धरली होती का? या संदर्भात एमएमआरडीएने स्पष्ट आणि तत्पर उत्तर द्यायला हवे होते.
मोनोरेलच्या मार्गावरील वळणे तीव्र आहेत. या वळणांचे डिझाइन सर्वसाधारण सुरक्षा निकषांचे पालन करते का? मोनोवरील ही तीव्र वळणे मार्ग कमी करण्यासाठी की अन्य कोणत्या कारणांनी ठेवली गेली? याची सखोल चौकशी करायला हवी. या लाईट व्हर्टिकल मार्गिकेचे डिझाईन सुरक्षिततेच्या दृष्टीने वाईट आहे. मोनोच्या डिझाइन आणि बांधकामातील चुका स्पष्टपणे दिसतात. भविष्यात असे मिनी मेट्रो प्रकल्प उभारले जाणार असतील तर त्यातील या त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.
गर्दीच्या वेळी ताशी २० हजार प्रवाशांची वाहतूक केली तरच मेट्रो चांगला वाहतूक पर्याय ठरतो. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशातील १८ हून अधिक शहरांतील ९५ टक्के मेट्रो गर्दीच्या वेळेत ताशी १५ हजारांहून कमी प्रवाशांची वाहतूक करतात. यामागे मेट्रो प्रवासी संख्येचे अंदाज कृत्रिमरीत्या मांडले जातात हे कारण आहे. या प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट पुरेसे नाही, तर अन्य वाहतूक पर्यायांच्या तुलनेत त्यांची व्यवहार्यता पाहणे महत्त्वाचे आहे.
टॅक्सी, ऑटो, डेडिकेटेड बस लेन, कार पुलिंग यांसह अन्य पर्यांयाचा विचार करता मोनोची संकल्पना अधिक कमकुवत असल्याचे दिसते. त्यामुळे आपण शहरातील ८० टक्के लोकांना परवडेल आणि इंधन, तसेच प्रदूषण कमी करेल अशा रीतीने आपल्याला मर्यादित ट्रॅफिक स्पेस आणि रस्त्यांचा वापर कार्यक्षमतेने करायला हवा.
मोनोची प्रवासी संख्या आणि भाड्याचे अंदाजही चुकीचे ठरले. ही बाब गंभीर आहे. उन्नत किंवा भुयारी मेट्रोच्या संकल्पनेतच त्रुटी आहेत. मोनो, मेट्रो प्रकल्प हे कार लॉबीला खूष करण्यासाठी उभारल्याचा संशय आहे. यामागे बस रस्त्यावरची जागा व्यापते, मेट्रो घेत नाही, असा समज आहे. मात्र भूमिगत मेट्रो अत्यंत खर्चिक आहे. दिल्लीचा अपवाद वगळता ती कुठेच व्यवहार्य ठरलेली नाही.