Join us  

शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

By महेश गलांडे | Published: November 15, 2020 9:18 PM

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत भाजपाने पिठलं-भाकरी आंदोलन केले होते. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेल्याचा आरोप भाजपाने केला होता. तर, आमदार रवि राणा यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत देण्याच मागणी करत आंदोलन पुकारले. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर, खासदार नवनीत राणा यांनीही काही महिला पदाधिकाऱ्यांसह येथील मध्यवर्ती कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने आंदोलकांवर कारवाई केल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारले आहेत. तसेच, शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का, असा सवालही त्यांनी केला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. रविवारी अखेर आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा कोर्टानं जामीन मजूर केला. अखेर रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. सरकारच्या या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

  

''शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, म्हणून आंदोलन केले तर कारागृहात डांबले. शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन ‘मातोश्री‘वर भेटण्यासाठी रेल्वेने निघाले, तर खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध केले. शेतकऱ्यांना 25-50 हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?. मागणी करणाराचे निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली असती, त्यांचे दुःख समजून घेतले असते, तर किमान आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे समाधान शेतकऱ्यांना मिळाले असते, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. आंदोलन केले की अटक,कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का?,'' असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे. 

नवनीत राणांवरही गुन्हे दाखल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे खासदारांसह 14 जणांवर फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम 188 व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. यामध्ये खासदार नवनीत राणा (रा.शंकरनगर), नऊ महिला पदाधिकारी, दीपक अंबाडकर (रा. बेलपुरा), शिवदास उकडराव घुले( रा. रविनगर), नीलेश विजय भेंडे( रा. अमर कॉलनी) राहुल काळे ( रा. वलगाव ) असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर भादविची कलम 143, 188, सहकलम आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51(ब)सहकलम 3,4. साथीचा अधिनियम 1897 सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदानुसार गुन्हा नोंदविला. 

आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून खासदारांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. कारागृहात असलेलेल्या आमदार रवि राणा यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी भेटण्याचा आग्रह धरून जोरजोरात नारेबाजी करून ठिय्या आंदोलन छेडल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. यासंदर्भात फियार्दी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी तक्रार नोंदविली आहे. आमदार रवि राणा हे मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाले होते, त्यावेळी त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनवनीत कौर राणाभाजपासरकारशेतकरी