Join us

सवाल मराठीचा : मराठी माध्यम पालकांचे संमेलन कशासाठी ? - आनंद भंडारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 12:31 IST

२५ आणि २६ नोव्हेंबर रोजी नरे पार्क मैदान, परळ, मुंबई येथे ‘मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुली - मुलांच्या पालकांचे महासंमेलन’ होणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्याची मातृभाषा पक्की असेल तर जगभरातली कुठलीही दुसरी भाषा आत्मसात करणं सहजशक्य होतं.

मुंबई -   २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी नरे पार्क मैदान, परळ, मुंबई येथे ‘मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुली - मुलांच्या पालकांचे महासंमेलन’ होणार आहे. मराठी शाळांच्या इतिहासात पहिल्यांदाच होणाऱ्या या संमेलनात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, वसई-विरारपासून ते अगदी पालघर-डहाणू येथील वेगवेगळ्या शाळांचे हजारो पालक, शिक्षक आणि विद्यार्थी  या संमेलनात सहभागी होणार आहेत. मराठी अभ्यास केंद्र या संस्थेने जरी यात पुढाकार घेतला असला तरी मराठी शाळा, मराठी भाषा टिकली पाहिजे असं वाटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या  व अनेक सहयोगी संस्थांच्या सहकार्यातून हे संमेलन यशस्वी होणार आहे. 

मातृभाषेतील शिक्षणाने विद्यार्थ्यांचा बौध्दिक आणि मानसिक विकास होतो. विद्यार्थ्याची मातृभाषा पक्की असेल तर जगभरातली कुठलीही दुसरी भाषा आत्मसात करणं सहजशक्य होतं. त्यामुळे मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व पटवून देणं हे या संमेलनाचे एक उद्दिष्ट आहे. ‘इंग्रजी भाषा शिकायची असेल तर इंग्रजी माध्यमातच पाल्यांना पाठवले  पाहिजे' हा एक फार मोठा गैरसमज आहे. मराठी माध्यमात राहूनही विद्यार्थ्यांचं इंग्रजी उत्तम होऊ शकतं, होतं. शिवाय तंत्रज्ञानाचा फायदाही पालकांना उपलब्ध आहे. थोडक्यात मराठी माध्यमात शिकूनसुध्दा आपल्या पाल्याचं उत्तम इंग्रजी होऊ शकतं, त्यासाठी इंग्रजी माध्यमचं निवडायची काहीही आवश्यकता नाही, हा विश्वास पालकांमध्ये रूजवणं हे या पालक संमेलनाचं एक उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अनेक प्रयोगशील शाळा आहेत.

त्या शाळांच्या उपक्रमांचे आदान प्रदान होणं, इतरही शाळांनी ते उपक्रम आपापल्या शाळांमधे राबवणं, पालकांनीही तसा आग्रह धरणं यातून इतरही शाळांची गुणवत्ता वाढू शकते. या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व प्रयोगशील शाळांना त्यांचे उपक्रम सादर करण्याची संधी त्यानिमित्ताने मिळणार आहे. मराठी शाळांच्याबाबत कोरड्या संवेदनेच्या पलिकडे कुठलीही भूमिका राजकीय वर्ग घेत नाही. ती भूमिका घ्यायला भाग पाडणं आणि मराठी शाळांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे हे शासनाच्या कानापर्यंत पोचविण्याचं काम या संमेलनाच्यामार्फत करण्यात येणार आहे.

मराठी माध्यमात शिकूनही आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, रोजगाराची नवनवीन क्षेत्रे त्यांना काबीज करता येतात आणि आपल्याबरोबर असंख्य पालकांनी मराठी शाळांचा पर्याय निवडलेला आहे हा विश्वास पालकांमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे. ही गरज पूर्ण करण्याचं महत्वाचं काम हे पालक संमेलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.  या पालक संमेलनाच्या निमित्त वेगवेगळ्या शाळांमधे आयोजनपूर्व बैठका होत आहेत. 'मराठी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पालकांनी आग्रही व्हायला हवे' या आवाहनाला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. 

ज्या पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत घालायचे आहे, त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमाचा पर्याय निवडायचा आहे अशा नव्या पालकांना निर्णय घेण्यासाठी या संमेलनातून मार्गदर्शन मिळणार आहे. तर इंग्रजी माध्यमात घालून आपण आपल्या पाल्याचं खरंच नुकसान केलेलं आहे आणि त्या निर्णयाचे परिमार्जन म्हणून मराठी शाळांमागे खंबीरपणे उभे रहायला हवं असं वाटणाऱ्या पालकांसाठीसुद्धा हे पालक संमेलन ही एक आयती संधी आहे. त्यामुळे मराठी माध्यमातील आणि मराठी माध्यमाकडे वळू पाहणारे असे सर्व पालक या संमेलनाच्या निमित्ताने एक व्हावेत आणि ‘मराठी शाळा टिकल्या पाहिजेत’ हा नारा त्यांनी या पालक संमेलनात बुलंद केला तर मराठी शाळांबाबत दिसणारे आजचे निराशाजनक वातावरण बदलण्याची ती सुरूवात ठरेल.

(लेखक पालक संमेलनाचे समन्वयक आहेत)