Join us

आपत्कालीन कक्ष का सुरू झाले नाहीत? अतिरिक्त आयुक्तांनी केली कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 10:46 IST

अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सगळ्या सहायक आयुक्तांची झाडाझडती घेत चांगलीच कानउघाडणी केली. 

मुंबई : मागील वर्षी पावसाळ्यासाठी पालिकेकडून २४ प्रशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी  ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतर यातील अनेक ठिकाणी कुठे गोदामे तर कुठे इतर कार्यालयांची कार्यालये थाटण्यात आलेली आढळून आली आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सगळ्या सहायक आयुक्तांची झाडाझडती घेत चांगलीच कानउघाडणी केली. 

आपत्कालीन कक्ष का सुरू झाले नाहीत याचा जाब विचारत कक्षातील अतिक्रमणे काढून कक्ष सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तातडीने नियंत्रण कक्ष सुरु करून तिथे व्यवस्थापन नेमण्याच्या सूचनाही पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.  

२४ विविध प्रशासकीय विभागांत आपत्कालीन घटनांची आणि त्या पार्श्वभूमीवर आवश्यक मदत यंत्रणेची गरज भासू शकते. यासाठी मागील वर्षी आयुक्तांच्या सूचनेनुसार पहिल्यांदाच, मुंबईच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे, विभागीय नियंत्रण कक्ष स्वतंत्र मनुष्यबळासह तयार ठेवण्यात आले आहेत. त्यासोबतच ५८ हॉट लाइन्सची सुविधा ही महापालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाह्य यंत्रणांना जोडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली होती. ज्या पालिका कर्मचाऱ्यांना या विभागात काम करण्याची इच्छा असेल त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन नियंत्रण कक्षात नेमले जाणार आहे.

कक्ष सुरूच नाही :

पोलिसांमार्फत बसविण्यात आलेल्या ५३६१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा कक्षात उपलब्ध करून देण्यात येणार होती. मात्र अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आढावा बैठकीत काही विभाग कार्यालयांत आपत्कालीन कक्ष सुरू झाले नसल्याचे समोर आले तर जेथे सुरू झाले तेदेखील कालांतराने बंद झाल्याची माहिती पुढे आली. 

मुख्य व्यवस्थापकाची नेमणूक होणार :

विभागनिहाय आपत्कालीन नियंत्रण कक्ष पुढील २४ तासांत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कक्षासाठी एक मुख्य व्यवस्थापक नेमला जाणार आहे.कक्षामध्ये आवश्यक साधन सामग्री आणि उपकरणे पुरवली जाणार आहेत. ज्या पालिका कर्मचाऱ्यांना या विभागात काम करण्याची इच्छा असेल त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन नियंत्रण कक्षात नेमले जाणार आहे.

विभागीय नियंत्रण कक्षाच्या बाबतीत काही त्रुटी आढळून आल्यानंतर आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षाबाबत आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांकडून ती कार्यवाही होत आहे.- डॉ सुधाकर शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त

टॅग्स :मुंबईनगर पालिका