हात जोडतो, वाद काढू नका... म्हणण्याची वेळ का येते?
By अतुल कुलकर्णी | Updated: March 31, 2025 13:39 IST2025-03-31T13:38:42+5:302025-03-31T13:39:57+5:30
Maharashtra: ही भावना एकट्या चंद्रकांत पाटील यांची नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात हीच भावना आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना जर या गोष्टी लक्षात येत असतील आणि ते या टोकाला जाऊन त्या भावना बोलून दाखवत असतील, तर त्यांचे हे मत, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना व सहयोगी पक्षाला का कळत नसावे?

हात जोडतो, वाद काढू नका... म्हणण्याची वेळ का येते?
- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार या दोघांनी नुकतीच रायगडाला भेट दिली. त्यावेळी बोलताना, 'राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. सामान्य माणसाला तुमच्या या वादात रस नाही. राज्यातील नेत्यांना हात जोडून साष्टांग दंडवत घालून विनंती करतो की, असे वाद उकरून काढू नका...' या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपला उद्वेग व्यक्त केला आहे. ही भावना एकट्या चंद्रकांत पाटील यांची नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात हीच भावना आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना जर या गोष्टी लक्षात येत असतील आणि ते या टोकाला जाऊन त्या भावना बोलून दाखवत असतील, तर त्यांचे हे मत, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना व सहयोगी पक्षाला का कळत नसावे? प्रत्येकाला काही ना काही तरी वाद निर्माण करून प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे, एवढेच काम उरलेले दिसते.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानावर केलेले भाषण अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी चहाच्या टपरीवर पोहे खात मोबाइलवर पाहिले, त्याची देखील बातमी झाली. नेत्यांनाच अशा बातम्या याव्या वाटतात, यासारखे दुर्दैव नाही. आपला ज्या गोष्टीची संबंध नाही, अशा कोणत्याही वादग्रस्त विषयावर माध्यमांचे प्रतिनिधी दिसले की बडबोले नेते, मंत्री हिरीरीने बोलू लागतात. मात्र, याच नेत्यांना दरडोई उत्पन्न, महागाई, रस्त्यावरचे खड्डे, आरोग्य सुविधांच्या नावाने होणारी बोंबाबोंब हे विषय विचारले की, हा आपला विषय नाही, असे सांगून ते काढता पाय घेतात. आपल्या प्रश्नांसाठी आपण जायचे तरी कोणाकडे? हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. आपण निवडून दिलेले हेच नेते आहेत का?, असा प्रश्न पडावा इतके बेताल आणि बेभानपणे त्यांना त्यांचे नेते वागताना, बोलताना दिसत आहेत. आपल्या बोलण्यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होते, हे समजत असूनही नितेश राणेंसारखे मंत्री कोणत्याही विषयावर बोलण्याचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे बोलतात. संजय शिरसाटही त्याला अपवाद नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा उद्रेक या अशा बडबोल्या मंत्र्यांसमोर व्यक्त करायला हवा.
आपल्या बोलण्याने आपलेच सरकार बदनाम होत आहे, याचे कसलेही सोयरसुतक निष्कारण बडबड करणाऱ्या मंत्र्यांना उरलेले नाही. रायगडचे पालकमंत्री कोण होणार? इथपासून ते कुणाल कामराच्या गाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत, प्रत्येकाला बोलायचे आहे. याच रायगड जिल्ह्याच्या वेशीवर पनवेलच्या हद्दीत राजरोसपणे डान्सबार सुरू आहेत. काही डान्सबार तर शाळेला खेटून आहेत. याविषयी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, या गोष्टी बंद पाडाव्यात, असे कोणालाही वाटत नाही. डान्सबार चालवणारे, पोलिस यंत्रणा, राजकीय पुढाऱ्यांना विकत घेतल्यासारखे मस्तीत वागतात. मोठ्या प्रमाणावर अशा डान्स बारमध्ये मुक्तपणे पैसे उधळले जातात. या डान्सबारमुळे अनेक संसार उघड्यावर पडल्याची शेकडो उदाहरणे आहेत. अनेक लोक देशोधडीला लागले. मात्र, कोणालाही हे प्रकार थांबवावे वाटत नाहीत. उलट यातून मिळणारी वरकमाई सगळ्यांना हवीहवीशी आहे.
बेताल बडबड करणाऱ्या नेत्यांना, मंत्र्यांना या गोष्टी दिसत नसतील का ? मात्र दिसत असूनही सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करण्याची कला साधी सोपी नाही. त्यासाठी मन दगडाचे असायला हवे. जे अनेक नेत्यांकडे आहे. ठरलेल्या नियोजनानुसार आपल्याला 'गांधीदर्शन' होत आहे ना, मग आपण बाकीच्यांची चिंता कशाला करायची? ही वृत्ती पनवेलचा पूर्ण पट्टा पोखरून टाकू लागली आहे. केवळ याच भागात नाही, तर नवी मुंबई आणि मुंबईतल्या अनेक ठिकाणी राजरोसपणे डान्सबार सुरू आहेत. ज्या भागात डान्सबार आहेत, त्या भागातल्या पोलिस अधिकाऱ्यांचे उत्पन्न तपासले, तर डोळे पांढरे होतील. उलट डान्सबार विरोधातील बातम्या फोटो छापून आले की, 'सेक्शन गरम हैं, भाव बढा के देना पड़ेगा...', असे म्हणत जास्तीचे पैसे उकळणारेही अनेक अधिकारी आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या व सहयोगी पक्षाच्या मंत्र्यांचे चिंतन शिबिर घेतले पाहिजे. राज्यापुढे बेरोजगारी, पाणीटंचाई, महागाई यांसारखे अनेक विषय आहेत. मंत्री म्हणून हे विषय आपण कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत, याचे मार्गदर्शन या नेत्यांना बंद खोलीत घालून केले पाहिजे. एवढे करूनही जर त्यांचे बोलणे थांबणारच नसेल, तर त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची हीच ती योग्य वेळ, असे ठणकावून सांगितले पाहिजे. बीड जिल्ह्यात जे चालू आहे, तसेच प्रकार अनेक ठिकाणी लहान-मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. फक्त त्याच्या बातम्या येत नाहीत एवढेच. एखादी घटना घडली की, त्यावर तत्काळ प्रतिक्रिया द्यायची किंवा एखाद्याने विशिष्ट विधान केले की, त्याला प्रतिउत्तर द्यायचे. यातच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानणाऱ्या नेत्यांचे कान आता मुख्यमंत्र्यांनी धरले पाहिजेत. जेणेकरून चंद्रकांत पाटील यांना जाहीरपणे असा त्रागा करण्याची वेळ पुन्हा येणार नाही.