धुळ्याच्या कमिटीएवढी प्रसिद्धी आम्हाला का नाही?

By अतुल कुलकर्णी | Updated: May 25, 2025 10:16 IST2025-05-25T10:15:50+5:302025-05-25T10:16:46+5:30

सगळे आम्हालाच विचारू लागले, हा मे महिना आहे की जून..?

why do not we have as much publicity as the dhule committee | धुळ्याच्या कमिटीएवढी प्रसिद्धी आम्हाला का नाही?

धुळ्याच्या कमिटीएवढी प्रसिद्धी आम्हाला का नाही?

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

माननीय राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

मी, श्यामराव, विठ्ठलराव आणि आमची सखूबाई, अशी आमची एक कमिटी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेली होती. आम्ही पडलो नवे नवखे. नेमके कुठे जायचे, कसे जायचे? आम्हाला काही माहिती नव्हते. जिथे बेफाम पाऊस झाला, त्याच गावात नेमकी आमची कमिटी गेली. जाताना वाटेत आमच्या डबड्या गाडीचे टायर पंक्चर झाले. कसेबसे गावात पोहोचलो, तर शेतकऱ्यांनी आम्हाला गराडा घातला. सगळे आम्हालाच विचारू लागले, हा मे महिना आहे की जून..? 

धो धो पावसाने सगळ्या शेताची वाट लावली होती. कोणाची ज्वारी उभ्या उभ्या काळी पडली होती, तर कोणाच्या टोमॅटोचा शेतात चिखल झाला होता. भाजीपाला तर हातातही धरवत नव्हता. शेतकरी म्हणू लागले, हातातोंडाशी आलेला घास गेला... शाळा सुरू होतील, लेकराबाळांच्या वह्या-पुस्तकांचं काय? खासगी शाळांची फी परवडत नाही... सरकारी शाळेत नीट शिकवत नाहीत... या वर्षी पोरीला शहराच्या कॉलेजात जायचं होतं. तिथं दोघी-तिघी रूम करून राहणार होत्या. त्यासाठी पैका कुठून आणायचा..? एक शेतकरी धोतराच्या सोग्यांना डोळे पुसत म्हणाला, तुम्ही तर कमिटीवाले. तुमच्या स्वागताला सरकारी गेस्ट हाउसवर नोटाच्या बॅगा असतात. इथल्या गेस्ट हाउसवर जा... तिथं तुमच्या स्वागताला बॅगा ठेवल्या असतील... त्यातल्या काही नोटा आम्हाला द्या... शेताचे नुकसान भरून निघणार नाही; पण थोडी फार मदत तरी होईल... 

आम्ही तिघे एकमेकांची तोंडं बघू लागलो... कुठल्या मुहूर्तावर आपली कमिटी गावात आली, असा आम्हाला प्रश्न पडला. त्यापेक्षा आमची कमिटी धुळ्याला गेली असती तर बरे झाले असते. गेस्ट हाउसचा रस्ता दाखवायला आमच्याकडे कोणी ‘किशोर’ नव्हता. आमचे आम्हीच शासकीय गेस्ट हाउसवर झोपायला गेलो. आम्हाला वाटलं खोलीत बॅगा असतील... त्यात नोटा असतील...  कसलं काय अन् फाटक्यात पाय...? खोलीत बॅगा नव्हत्या. मात्र, सगळीकडे डास, ढेकूण स्वागताला होते. धुळ्याला जी कमिटी गेली होती तसाच दर्जा आमच्या कमिटीला असता, तर आम्हालाही प्रत्येकाला सेपरेट रूम मिळाली असती. आमच्याही रूममध्ये नोटांनी भरलेल्या बॅगा आल्या असत्या. आमच्या कमिटीला असला दर्जा मिळविण्यासाठी काय करावे लागते..?

तुम्ही म्हणाल, हे नसते उद्योग तुम्ही कशाला करत बसलात..? पण खरं सांगू का साहेब, आम्ही चौघं  गप्पा मारत बसलो होतो. कमिटी गावागावात जाऊन नेमके बघते काय आपणही शोध घेतला पाहिजे, असं आमच्या चर्चेतून ठरलं... म्हणून आम्ही निघालो. एक चूक झाली. जाताना तुम्हाला सांगून जायला पाहिजे होतं... म्हणजे आमचा देखील चोख बंदोबस्त झाला असता... धुळ्याच्या कमिटीला जसा एक ‘किशोर’ मिळाला, तसा आमच्या कमिटीला एखादा ‘किशोर’ दिला असता, तर आम्ही कसलाही ‘शोर’ न करता गावागावात फिरून आलो असतो. पुढच्या वेळी जाताना नक्की तुम्हाला सांगून जाऊ... 

साहेब, शिकल्या-सवरल्या माणसांना गाडीसाठी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट मिळवायला जीव जात आहे... आरटीओमध्ये मध्यस्थाशिवाय कोणाला दारात उभे करत नाहीत... शाळेच्या ॲडमिशनचे दिवस सुरू होतील. मंत्र्यासंत्र्याची पत्र आणली, तरी त्यावर वजन ठेवल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, असं आत्तापासूनच संस्था चालक सांगतात... पावसाळ्याच्या तोंडावर शिवार नांगरून ठेवू.. बी-बियाणं आणू असं नियोजन केलं होतं... पण पावसानं शेतावरच नांगर फिरवला... आता बी-बियाणं, खतं आणायची म्हटलं तर त्यासाठी दुकानदार आत्तापासूनच जास्तीचे मागू लागला आहे... सरकारी कार्यालयातील एक काम बिनापैशाचं होत नाही... अधिकारी म्हणतात, आम्हाला बदलीसाठी पैसे द्यावे लागतात... तिकडे दिलेले व्याजासहित आम्ही कोणाकडून वसूल करायचे... तुमच्याशिवाय आहेच कोण...? आमच्या कमिटीच्या या अहवालाकडे कोण लक्ष देणार..? मीडियावाले धुळ्याच्या कमिटीचे जास्त कव्हरेज करू लागले... आमच्या कमिटीकडे कोणी ढुंकूनही बघायला तयार नाही... 

आता झेडपी, पालिकेच्या निवडणुका येणार आहेत. तयारीला लागा अशा सूचना आहेत... त्यामुळे आमच्या अहवालाकडे बघायला कोणालाही वेळ भेटणार नाही, हे सांगायला कोणाचीच गरज नाही... शक्य झालं तर पावसाळी अधिवेशनात आमच्या कमिटीचा विचार करा... जास्त काय लिहू...

- तुमचाच बाबूराव

 

Web Title: why do not we have as much publicity as the dhule committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे