इंधन दरवाढीविरोधात बच्चन, अक्षय कुमार गप्प का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST2021-07-09T04:06:40+5:302021-07-09T04:06:40+5:30

मुंबई : काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल ६८ रुपये लिटर असताना उद्विग्न होऊन ट्विटरवर स्वतःची गाडी जाळण्याची भाषा करणारे अमिताभ ...

Why Bachchan, Akshay Kumar are silent against fuel price hike? | इंधन दरवाढीविरोधात बच्चन, अक्षय कुमार गप्प का ?

इंधन दरवाढीविरोधात बच्चन, अक्षय कुमार गप्प का ?

मुंबई : काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल ६८ रुपये लिटर असताना उद्विग्न होऊन ट्विटरवर स्वतःची गाडी जाळण्याची भाषा करणारे अमिताभ बच्चन आणि जनतेला स्वतःची गाडी विकून सायकल वापरण्याचा सल्ला देणारे अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांना सध्याची इंधन दरवाढ दिसत नाही का, असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी गुरुवारी केला.

पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाईविरोधात मुंबई काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. उत्तर मुंबईतील बोरिवली विधानसभा क्षेत्र, दक्षिण मध्य मुंबईतील धारावी विधानसभा क्षेत्र व आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा सहभागी झाले होते. यावेळी भाई जगताप म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात ६८ रुपये असलेल्या पेट्रोलवर बोलणारे आज पेट्रोल १०६ रुपये प्रतिलिटर इतके भरमसाट वाढलेले असताना हे कलाकार मूग गिळून गप्प का बसले आहेत? यांनी स्वतः गाडी वापरणे बंद केले की वाढलेले पेट्रोल व डिझेलचे दर यांना दिसत नाहीत, याचे उत्तर बाॅलिवूड कलाकारांनी द्यायला हवे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल ५८ रुपये, नेपाळमध्ये ५६ रुपये, तर बांग्लादेशमध्ये ५८ रुपयांत मिळत असताना भारतात मात्र दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढवून देशातील सर्वसामान्य नागरिकांचे रक्त पिणे केंद्र सरकारने बंद करावे, असेही भाई जगताप म्हणाले.

या आंदोलनामध्ये भाई जगताप व चरणसिंग सप्रा यांच्यासमवेत, कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, उपाध्यक्ष झिया उर रहमान, नगरसेविका आफरीन शेख, जिल्हाध्यक्ष हुकुमराज मेहता, प्रमोद मांद्रेकर यांच्यासह मुंबई काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Why Bachchan, Akshay Kumar are silent against fuel price hike?