चुरशीच्या लढतीत कोणाची सरशी?
By Admin | Updated: October 13, 2014 01:06 IST2014-10-13T01:06:23+5:302014-10-13T01:06:23+5:30
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

चुरशीच्या लढतीत कोणाची सरशी?
प्रशांत माने, कल्याण
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील अंतर्गत वाद आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
यंदाच्या निवडणुकीत तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत कुरबुरी आहेत. पण, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सगळ्याच उमेदवारांनी आघाडी घेतल्याने होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कोणाची सरशी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कल्याण पश्चिममध्ये १७ उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेता तेव्हाही १८ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले होते. त्या वेळी एकूण ३ लाख २२ हजार ५२९ मतदारांपैकी केवळ १ लाख ४४ हजार ८९४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गेल्या निवडणुकीत भाजपाचे मंगेश गायकर यांनी बंडखोरी केल्याने मतदारसंघात चौरंगी लढत ंपाहायला मिळाली. यात युतीची मते विभागल्याने मनसेच्या उमेदवाराचा अनपेक्षितपणे विजय झाला होता. यंदा मात्र महायुती आणि आघाडीचा घटस्फोट झाल्याने इतर मतदारसंघांप्रमाणे कल्याण पश्चिमेतही पंचरंगी लढत होत आहे. निवडणुकीच्या आतापर्यंतच्या प्रचाराचा आढावा घेता सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. शरद पवार, राज ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, सुषमा स्वराज या नेत्यांच्या ाप्रचारसभा, रोड शो, बैठकांनी निवडणुकीचे वातावरण पूर्णत: ढवळून निघाले असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यातही हा जोश कायम राहिला आहे. अखेरच्या टप्प्यात प्रचारसभांचा धडका सुरू असताना दुसरीकडे वैयक्तिक भेटीगाठी, घरोघरी संपर्क यावर भर दिला जात आहे.