मुंबई-अहमदाबाद मार्गावर नजर कुणाची
By Admin | Updated: May 5, 2015 00:11 IST2015-05-05T00:11:43+5:302015-05-05T00:11:43+5:30
दोन वर्षापूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिरसाड व डहाणू तालुक्यातील चारोटी येथे झालेल्या अपघातानंतर तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी

मुंबई-अहमदाबाद मार्गावर नजर कुणाची
वसई : दोन वर्षापूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिरसाड व डहाणू तालुक्यातील चारोटी येथे झालेल्या अपघातानंतर तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र याला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. विद्यमान पालकमंत्र्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. अपघाताची मालिका आजही सुरुच असून त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.
या महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यानंतर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली. गेल्या काही वर्षात टँकर-प्रवासी बस यांच्यात टक्कर, वाहनांना आगी लागण्याच्या घटना घडल्या. शिरसाड व चारोटी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये ४० ते ५० नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनांचे पडसाद त्यावेळी झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत उमटले होते. तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले. कॅमेरे बसविण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने अधिकाऱ्यांनी आदेशाकडे तेव्हा दुर्लक्ष केले. रविवारी पुन्हा महामार्गावर अपघात झाला. या घटनेनंतर संतापाची लाट आहे. विद्यमान पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(प्रतिनिधी)