लालबागमध्ये कोण साधणार सरशी?

By Admin | Updated: February 16, 2017 02:26 IST2017-02-16T02:26:55+5:302017-02-16T02:26:55+5:30

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबागमध्ये महापालिका निवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळेल. प्रभाग क्रमांक २०४ मध्ये

Who will lead Lalbaug? | लालबागमध्ये कोण साधणार सरशी?

लालबागमध्ये कोण साधणार सरशी?

चेतन ननावरे / मुंबई
शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबागमध्ये महापालिका निवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळेल. प्रभाग क्रमांक २०४ मध्ये सर्वात कमी म्हणजेच केवळ चारच उमेदवार उभे असून, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी अशी तिरंगी लढत या ठिकाणी अपेक्षित आहे.
लालबागमध्ये एकगठ्ठा मराठी मते असून, काही अंशी गुजराती मतदार आहेत. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने या ठिकाणी मजबूत पकड प्रस्थापित केली होती. मात्र, मागील महापालिका निवडणुकीत मनसेला या ठिकाणी ‘काटे की टक्कर’ दिल्यानंतर पराभव पत्करावा लागला होता. त्यात यंदा सेनेला भाजपाची साथ नसल्याने मनसेचे तगडे आव्हान सेनेसमोर
असेल.
यंदा सेनेने स्थानिक नगरसेविका हेमांगी (ममता) चेंबूरकर यांच्याजागी या ठिकाणी अनिल कोकीळ यांना उमेदवारी दिली आहे. कोकीळ यांच्याविरोधात भाजपाने अरुण दळवी यांना मैदानात उतरवले आहे, तर विभागाध्यक्ष सचिन देसाई यांना उमेदवारी देत, मनसेने संपूर्ण विभागाची ताकद या जागेसाठी पणाला लावली आहे. काँग्रेसकडून प्रकाश सावंत यांना उमेदवारी मिळाली असली, तरी या लढ्यात अद्याप तरी त्यांना
फारशी चमक दाखवता आलेली
नाही.
सातत्याने सेनेकडे सत्ता असतानाही या ठिकाणचे बरेचसे प्रश्न अद्याप सुटले नसल्याचे निदर्शनास येते. त्यात लालबागमधील मच्छीमार्केटची दुरवस्था डोळ््यात खुपणारी आहे. डागडुजीच्या प्रतीक्षेत असलेली बेस्ट वसाहत तर कधीही ढासळण्याची शक्यता आहे, तर घराबाहेर मृत्यू झाल्यास पुन्हा घरात प्रवेश न करता येणाऱ्या चिंचोळ््या गल्लीच्या एस.पी. कंपाउंडचा मुद्दा आजही अनुत्तरीतच आहे.
विभागातील कचऱ्याचा प्रश्नही ज्वलंत आहे. पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने मतदारांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Web Title: Who will lead Lalbaug?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.