कोण होणार नवी मुंबई महापालिकेचा महापौर?
By Admin | Updated: May 5, 2015 02:39 IST2015-05-05T02:39:51+5:302015-05-05T02:39:51+5:30
येत्या ९ मे रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी

कोण होणार नवी मुंबई महापालिकेचा महापौर?
नवी मुंबई : येत्या ९ मे रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १पर्यंत उमेदवारी अर्ज सादर केले जाणार आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांविषयी निर्माण झालेल्या सस्पेन्सवर उद्या पडदा पडणार आहे.
महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस १११ पैकी ५२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे.
बहुमतासाठी आणखी चार जागांची आवश्यकता असली तरी काँग्रेस व अपक्षांना बरोबर घेऊन महापौर निवडणुकीच्या माध्यमातून होऊ पाहणाऱ्या घोडेबाजाराला लगाम घालण्यात नाईक यांना यश आले आहे. विशेष म्हणजे यावेळचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने अपक्ष म्हणून निवडून आलेले सुधाकर सोनवणे यांचे नाव आघाडीवर आहे. असे असले तरी राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांचा सोनवणे यांच्या नावाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर नाईक काय भूमिका घेतात, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमहापौरपद काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. या पदाचा उमेदवार कोण असेल, हे सुध्दा उद्या उघड होणार आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
उद्या स्वीकृत म्हणून घ्यावयाच्या सदस्यांचेही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे या उत्सुकतेलासुध्दा पूर्णविराम मिळणार आहे. (प्रतिनिधी)