स्कायवॉक नेमके कोणासाठी?
By Admin | Updated: September 1, 2014 04:50 IST2014-09-01T04:50:02+5:302014-09-01T04:50:02+5:30
गेल्या ५ वर्षांत ठाण्यात एकूण ३ स्कायवॉक तर ३ फूट ओव्हर ब्रिज पादचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले.

स्कायवॉक नेमके कोणासाठी?
स्नेहा पावसकर, ठाणे
गेल्या ५ वर्षांत ठाण्यात एकूण ३ स्कायवॉक तर ३ फूट ओव्हर ब्रिज पादचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले. मात्र प्राण्यांचा वावर, फेरीवाले-विक्रेत्यांची गर्दी आणि प्रेमीयुगुलांनी कब्जा केलेले कोपरे अशी सद्य:स्थिती आहे या सर्व स्कायवॉकची. त्यामुळे करोडो रुपये खर्चून बांधण्यात येणारे हे स्कायवॉक नेमके कोणासाठी उभारले जातात, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच आता विटावा ते ठाणे नवा स्कायवॉक उभारला जाणार आहे. विटावावासीयांसाठी हा उत्तम पर्याय ठरेल, अशी शक्यता वर्तविली जात असली तरी एस्केलेटरविना हा स्कायवॉक खरोखरच वापरला जाईल की तो लव्हबर्ड्सचे गार्डन ठरेल, हे तो खुला झाल्यावरच स्पष्ट होईल.
वाहतूककोंडीतून नागरिकांचा वेळ वाचावा आणि प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने दोन ठिकाणांना जोडणारे पूल उभारण्यात येतात. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सॅटीसला जोडून ३ स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी पादचारी पूल असे ठाणे पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकचे नाव असून, हा महापालिकेने उभारला आहे. याचे दोन भाग असून एक स्कायवॉक हा गावदेवी मंदिराजवळ खाली उतरतो. तर दुसरा स्कायवॉक हा ठाणे एसटी स्थानकाजवळ उतरतो. सुमारे ४ वर्षांपूर्वी हा स्कायवॉक पादचाऱ्यांच्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे. हे दोन्ही स्कायवॉक रेल्वे स्थानकातील एफओबीला जोडलेले असल्याने त्याचा पादचाऱ्यांकडून काही प्रमाणात वापर होतो. मात्र स्कायवॉकचा रस्ता हा वळणवळणाचा आहे. शिवाय असंख्य पायऱ्या चढून गेल्यावर तो वापरता येतो, तर रस्त्यावरून जाताना वाहतूककोंडी असली तरी हे अंतर स्कायवॉकच्या तुलनेत कमी आहे व जिने चढावे लागतात़ त्यामुळे नागरिक धक्केबुक्के खात आणि देत रस्त्यावरूनच चालणे पसंत करतात. ऊनपावसापासून संरक्षण करायचे असेल किंवा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत जायचे असेल तरच स्कायवॉक वापरावे, अशी ठाणेकरांची मानसिकता आहे. तसेच या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी आपली छोटेखानी दुकाने थाटल्यामुळे नागरिकांना चालणे शक्य होत नाही. तर ठाणे रेल्वे स्टेशन पूर्वेला असलेला स्कायवॉक एमएमआरडीएने उभारलेला असून त्याला नाव देण्यात आलेले नाही. या स्कायवॉकचे काम सध्या रखडलेले असून, एका ठिकाणी हा जुन्या रेल्वे पुलाला जोडला असून दुसरीकडे स्टेशन परिसरातच हा खाली उतरविण्यात आला आहे. पूर्वेचा हा स्कायवॉक म्हणजे गर्दुल्ले, भिकाऱ्यांच्या आसऱ्याचे तर प्रेमीयुगुलांच्या विसाव्याचे ठिकाण बनले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर आणि लुईसवाडी परिसरासमोर असे दोन एफओबी उभारले असून नागरिकांकडून याचा कमी वापर होताना दिसतो. (प्रतिनिधी)