वसई पंचायत समितीचा गटशिक्षणाधिकारी कोण?
By Admin | Updated: July 13, 2015 23:11 IST2015-07-13T23:11:29+5:302015-07-13T23:11:29+5:30
वसई पंचायत समिती शिक्षण विभागाला अद्याप कोणीच वाली नाही. गटशिक्षणाधिकारी कोण, याचे उत्तर पंचायत समितीच्या एकाही कर्मचाऱ्याकडे नाही.

वसई पंचायत समितीचा गटशिक्षणाधिकारी कोण?
वसई : वसई पंचायत समिती शिक्षण विभागाला अद्याप कोणीच वाली नाही. गटशिक्षणाधिकारी कोण, याचे उत्तर पंचायत समितीच्या एकाही कर्मचाऱ्याकडे नाही. एकाच वेळी दोघांकडे गटशिक्षणाधिकारीपदाचा भार दिल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांच्याकडे पालघर व वसई या दोन्ही तालुक्यांचा पदभार सोपविण्यात आला. त्यानंतर, त्यांनी कामकाज सुरू केले, परंतु अचानक पंचायत समितीने अन्य एका अधिकाऱ्याकडे वसईचे गटशिक्षणाधिकारीपद सोपविल्यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वसईचा भार नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यास नकार दिला. त्यामुळे सध्या शिक्षण विभागाचा कारभार वाऱ्यावर आहे.
वसई पंचायत समितीने ज्या अधिकाऱ्याकडे हा भार सोपविला आहे, तो लेखी स्वरूपात नसून तोंडी देण्यात आला आहे. यासंदर्भात पंचायत समितीच्या सभापतीने आता आ. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे धाव घेतली आहे. या सर्व गोंधळात शिक्षण विभागाच्या कारभाराचे मात्र तीनतेरा वाजले आहेत. वसई पंचायत समितीचा शिक्षण विभाग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. यापूर्वी कार्यालयाला आग लागणे, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गैरप्रकार होणे, विद्यार्थ्यांच्या गणवेशवाटपात प्रचंड गैरप्रकार होणे, अशा नानाविध कारणांनी शिक्षण विभाग सतत प्रकाशझोतात राहिला. या सर्व गोंधळामध्ये शिक्षक व विद्यार्थीवर्गाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)