Join us  

दक्षिण मुंबईतील मराठी मतांचा कौल कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:41 AM

दक्षिण मुंबईतील मराठी माणूस गेल्या दशकभरात उपनगरात स्थलांतरित झाला. पूर्वी मराठीबहुल वस्त्या असलेल्या भागांमध्ये गुजरात, मारवाडी, उत्तर भारतीय व अन्य भाषिकांचे वास्तव्य वाढले.

मुंबई : दक्षिण मुंबईतील मराठी माणूस गेल्या दशकभरात उपनगरात स्थलांतरित झाला. पूर्वी मराठीबहुल वस्त्या असलेल्या भागांमध्ये गुजरात, मारवाडी, उत्तर भारतीय व अन्य भाषिकांचे वास्तव्य वाढले. त्यामुळे मराठी मतांवर विसंबून असलेल्या शिवसेनेला आता अन्य भाषिकांचीही दखल घ्यावी लागत आहे. परंतु आजही ४० टक्के मराठ्यांची मते दक्षिण मुंबईत निर्णायक ठरू शकतात.निवडून येण्यासाठी उमेदवार साम, दाम, दंड, भेदचा वापर करीत असले तरी त्यांचे भवितव्य मात्र मतदारांच्या हाती असते. आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोणाच्या हाती द्यायचं? आणि कोणाला घरचा रस्ता दाखवायचा? हे मतदारच ठरवित असतात. बऱ्याचवेळा मतांचे गणित हे पक्षाच्या विचारधारेबरोबरच भाषा यामध्येही मतांची विभागणी होत असते. मराठी मते शिवसेना, मनसे या पक्षांना तर उत्तर भारतीय मुस्लीम मते काँग्रेसला आणि गुजराती, मारवाडी मते भाजपच्या पारड्यात, असा अंदाज बांधला जातो. मात्र आजचा मतदार जागरूक असून त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव असल्याचे दिसून येते. त्यामुळे उमेदवारांना आता आपल्या पारंपरिक मतांवरही विसंबून राहणे अवघड होत चालले आहे.दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत अशी थेट लढत होणार आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारांचा कौल मिळविण्याबरोबरच तब्बल साडेसहा लाख मतदार असलेला मराठी टक्काही खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मनसेबरोबर युतीमुळे काही प्रमाणात मराठी मते काँग्रेसच्या पारड्यात पडतील.पण शिवसेनेने गुजराती मतदारांना खूश करताना मराठी वस्त्यांवरही आपली पकड ठेवली आहे. त्यामुळे मराठी मतांची विभागाणी होणार का? त्याचा काय परिणाम होईल? याविषयी उत्सुकता वाढत आहे.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019उद्धव ठाकरेराज ठाकरेमुंबई दक्षिण