Who is the BJP candidate for the Legislative Assembly? | विधानसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण?
विधानसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण?

मनीषा म्हात्रे, मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतील भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुलुंड विधानसभामधून युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या पारड्यात मोदी लाटेपेक्षा जास्त मते पडली. तर, आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांची मते १२ हजारांनी वाढली आहेत. या निकालामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पोषक वातावरण निर्माण झाले आहे़ मात्र मनोज कोटकांच्या विजयामुळे मुलुंंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला उमेदवार शोधावा लागेल.


मुलुंडमध्ये भ्रष्टाचाररूपी रावण- दहनानंतर माजी खासदार किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना असे चित्र मुलुंडमध्ये निर्माण झाले होते. मुलुंडमधील शिवसेनेने पाठिंबा न देण्याची भूमिका उघडपणे घेतली. नवा चेहरा म्हणून मुलुंडमध्ये १२ वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले कोटक यांची वर्णी लागली. पक्षप्रमुखांच्या आदेशाने शिवसैनिक प्रचारात उतरले. मुंबईचे पूर्वेचे प्रवेशद्वार म्हणजे मुलुंड. पूर्वेकडील नवघर, मिठागर, गव्हाणपाडा, निर्मलनगरपासून पश्चिमेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मुलुंड कॉलनीपर्यंत मुलुंड विस्तारले आहे.


उच्चभ्रू, मध्यम आणि गरीब अशी संमिश्र वस्ती या मतदारसंघामध्ये दिसून येते. गुजराती, मराठी आणि उत्तर भारतीय अशी चेहरेपट्टी मुलुंडला आहे. ४ हजार मतांनी मतदार वाढले. १९९९ पासून भाजपचे आमदार सरदार तारासिंग कार्यरत आहेत. पालिका निवडणुकीत भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील एका नगरसेविकेचे जात प्रमाणपत्रातील त्रुटीमुळे पद रद्द करण्यात आले होते. त्या जागी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळाली.
मुलुंडमध्ये कोटक यांची पकड आहे. मुलुंडचे रहिवासी त्यात, १२ वर्षे नगरसेवक म्हणून ते कार्यरत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सोमय्या यांना मोदी लाटेत १ लाख २० हजार ८१२ मते पडली होती. तर, पाटील यांना २८ हजार ३६६ मतांवर समाधान मानावे लागले होते. मुलुंड, भांडुप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर (पश्चिम), घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द-शिवाजीनगर या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मुलुंड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजेच ६३.६६ टक्के मतदान झाले. कोटक यांना सव्वा लाखापेक्षा अधिक मतदान झाले. मोदी लाटेपेक्षाही हे मतदान अधिक होते. गुजराती, व्यापारी वर्गासह मुलुंडमध्ये घराघरात कोटक परिचयाचे आहेत. त्याचाही फायदा मतदान वाढण्यास झाला. तर, पाटील यांच्या मतदानात १२ हजार मतांनी वाढ झाली आहे.

विधानसभेवर काय परिणाम...
मुलुंडची जागा भाजपसाठी निर्विवाद आहे़ येथून निवडणूक लढवण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे इच्छुक होते़
या मतदारसंघात भाजपचे विरोधक ताकदीचे नाहीत़ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसंपर्क येथे दांडगा नाही़ येथील मतदार भाजपचाच आहे़ मराठी मतदारांचा टक्का असूनही मनसेची जादू चालली नाही़
सरदार तारासिंग आता वयोमानामुळे थकले. तेव्हा त्यांना बदलावे यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यात आमदारकीचे प्रबळ दावेदार असलेले कोटक खासदार झाल्याने, नगरसेवक, पदाधिकारी आमदारकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, या चढाओढीतही वयाच्या ७७ व्या वर्षीही 'मीच आमदार होणार' म्हणून तारासिंग मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजपातील सत्तासंघर्ष तीव्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र उमेदवार कोणीही असला तरी, मुलुंडमध्ये पुन्हा भाजपचाच उमेदवार आमदार म्हणून निवडून येईल, असे या लोकसभा निकालाने दाखवून दिले.

मुलुंडमध्ये एकूण १ लाख २७ हजार ६६७ मते कोटक यांना मिळाली आहेत. उत्तर पूर्व मुंबईत मराठी-अमराठी वादामुळे मोठ्या प्रमाणात गुजराती मतदार एकगठ्ठा कोटक यांच्या बाजूने उतरलेला दिसून आला. तर, मनसे फॅक्टरही फेल गेल्यामुळे मराठी मतदारांनीही त्यांना पाठिंबा दिला. मुलुंडमध्ये त्यांच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उतरल्या. याचाही फायदा त्यांना झालेला दिसून आला.

 


Web Title: Who is the BJP candidate for the Legislative Assembly?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.