रात्रनिवारा केंद्राचा पांढरा हत्ती
By Admin | Updated: July 29, 2015 23:44 IST2015-07-29T23:44:36+5:302015-07-29T23:44:36+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने सुरू केलेल्या रात्रनिवारा केंद्राचा बोजवारा उडाला आहे. तीन वर्षांनंतरही फक्त आठ जणांना या योजनेचा लाभ झाला असून त्यासाठी ९ लाख रुपये

रात्रनिवारा केंद्राचा पांढरा हत्ती
- नामदेव मोरे, नवी मुंबई
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने सुरू केलेल्या रात्रनिवारा केंद्राचा बोजवारा उडाला आहे. तीन वर्षांनंतरही फक्त आठ जणांना या योजनेचा लाभ झाला असून त्यासाठी ९ लाख रुपये खर्च झाला आहे. या केंद्राचा स्थानिकांना त्रास होत असून ते बंद करण्याची मागणी केली जात आहे.
शहरी भागातील बेघर व निराश्रित लोकांसाठी रात्र निवारा केंद्र सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश सरकारने सर्व महापालिकांना दिले आहेत. एक लाख लोकसंख्या असणाऱ्या क्षेत्रात एक केंद्र उभारण्यास सांगितले होते. नवी मुंबईमध्ये किमान ११ केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे. शहरात नोकरी-व्यवसायासाठी आलेल्या निराश्रित नागरिकांना रात्री या केंद्रात राहण्याची सोय करणे अपेक्षित आहे. नागरिकांसाठी अल्पदरात जेवण, चहा, नाष्ता पुरविणेही अपेक्षित होते. या व्यतिरिक्त पालिकेनेच गादी, उशी व इतर सुविधा देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्तांनी जुलै २०११ मध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरात रात्रनिवारा केंद्रासाठी जागा शोधण्याच्या सूचना केल्या. मालमत्ता विभागाने पावणे, तुर्भे स्टोअर्स व श्रमिक नगरमधील समाजमंदिराची पाहणी केली. श्रमिक नगरचे समाजमंदिर सुस्थितीत असल्यामुळे त्या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले. केंद्राची माहितीच नागरिकांना नसल्यामुळे ते ओस पडले आहे. सध्या ८ नागरिक तिथे राहत आहेत. महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ८ लाख ९९ हजार रुपये खर्च केले आहेत. ही योजना फसली आहे.
महापालिकेने श्रमिक नगरमधील आदिवासी नागरिकांना पक्की घरे बांधून दिल्यानंतर त्यांच्यासाठी या ठिकाणी समाजमंदिर बांधले होते. पूर्वी या समाजमंदिरात परिसरातील नागरिकांचे वाढदिवस, लग्न व इतर कार्यक्रम करता येत होते. परंतु पालिकेने रात्रनिवारा केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.
रात्रनिवारा केंद्रात काही वेळा लोक मद्यपान करून येतात. केंद्राच्या खाली महापालिकेची शाळा भरते. तिथे येणाऱ्या नागरिकांमुळे त्यांनाही त्रास होतो. त्यामुळे केंद्र बंद करून इतर ठिकाणी सुरू करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. ही जागा रहिवाशांना सामाजिक कार्यक्रमांसाठी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
केंद्र बंद करण्याची मागणी : रात्रनिवारा केंद्रामुळे रहिवाशांना समाजमंदिराचा वापर करता येत नाही. येथील रहिवाशांमुळे नागरिकांना त्रासही होतो. यामुळे केंद्र पालिकेने तत्काळ बंद करून समाजमंदिर वापरासाठी खुले करावे अशी मागणी स्थानिक नगरसेविका मनीषा शशिकांत भोईर यांनी केली आहे. याविषयी प्रश्नही त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता.
जागेची निवड चुकली
महापालिकेने श्रमिक नगरमधील समाजमंदिरामध्ये रात्रनिवारा केंद्र सुरू केले. वास्तविक श्रमिक नगर एमआयडीसीमध्ये असले तरी तेथे जायचे कसे याचीच माहिती नागरिकांना नाही. कोपरखैरणे व तुर्भे रेल्वे स्टेशनपासून हे अंतर जवळपास ४ किलोमीटर आहे. कोणतीही बस या परिसरात जात नाही. ज्या बेघरांसाठी हे केंद्र सुरू केले आहे ते त्या ठिकाणी पोहचूच शकत नाहीत. जागेची निवड चुकल्यामुळेच हा प्रयोग फसला आहे.
घणसोली व कोपरखैरणेत नवीन केंद्र
महापालिकेने सिडकोकडून घणसोली व कोपरखैरणेमध्ये दोन भूखंड मिळविले आहेत. साडेचारशे व पाचशे चौरस मीटरचे भूखंड असून त्या ठिकाणी नवीन रात्रनिवारा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. भूखंड हस्तांतराची प्रक्रिया झाली असून पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.