मुजोर रिक्षा चालकांना अभय कोणाचे?
By Admin | Updated: July 7, 2014 01:48 IST2014-07-07T01:48:41+5:302014-07-07T01:48:41+5:30
विविध उपाययोजना करूनही रिक्षा चालक आपल्या बेशिस्त वर्तनात बदल करताना दिसत नाहीत.

मुजोर रिक्षा चालकांना अभय कोणाचे?
नवी मुंबई: विविध उपाययोजना करूनही रिक्षा चालक आपल्या बेशिस्त वर्तनात बदल करताना दिसत नाहीत. भाडे नाकारणे, दिवसाही हाफ रिटर्नची मागणी करणे, प्रसंगी प्रवाशांशी उध्दट वागणे, असे प्रकार सर्रास घडत असल्याने या मुजोर रिक्षा चालकांना अभय कोणाचे, असा सवाल आता प्रवासी उपस्थित करू लागले आहेत.
नवी मुंबईतील रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तणुकीची अनेक उदाहरणे आहेत. विविध राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली चालणाऱ्या रिक्षा चालकांच्या दहा ते बारा संघटना येथे कार्यरत आहेत. त्यामुळे येथे कोण कोणाचे ऐकायला मागत नाही. आरटीओ आणि वाहतूक विभागाकडून केली जाणारी कारवाईसुध्दा जुजबी स्वरूपाची ठरल्याने मुजोर रिक्षा चालकांचे चांगलेच फावले आहे. कारवायांना रिक्षा चालक भीक घालीत नसल्याचे दिसून आले आहे. वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, तुर्भे, सीबीडी-बेलापूर या विभागातून रिक्षा चालकांच्या अरेरावीच्या अनेक तक्रारी येत आहेत. रिक्षा चालकांच्या या वागण्याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाला बसत आहे.
रिक्षा चालकांकडून स्टॅण्डचा वापर केला जात नसल्याचे दिसून आले आहे. वाशी व सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील स्टॅण्डवर तर हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. स्टॅण्डच्या बाहेर उभे राहून जवळचे व नको असलेले भाडे नाकारण्याची वेगळीच शक्कल आता या रिक्षा चालकांनी शोधून काढली आहे. वाशी स्थानकासमोर इनॉर्बिट मॉलच्या स्टॅण्डवर रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा नेहमीच पाहावयास मिळतो.
साधारण रात्री नऊ वाजल्यानंतर सर्व रिक्षा स्टॅण्डच्या बाहेर उभ्या केल्या जातात. मॉलमधून खरेदी करून येणाऱ्या प्रवाशांना हातात सामानाच्या पिशव्या घेवून रिक्षासाठी मुख्य रस्त्यापर्यंत चालत यावे लागते. येथे आल्यानतंरही इच्छित ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा चालक तयार होईल, असे नाहीच. कारण सर्रासपणे भाडे नाकारले जाते. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होवू लागली आहे़ सानपाडा स्थानकाजवळ तर सर्व अनागोंदी कारभार आहे. रिक्षाचालकांची सर्वाधिक मनमानी या परिसरात पाहावयास मिळते. यासंदर्भात आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)