बाईमाणसांनी जायचे कुठे? अस्वच्छतेमुळे आजाराचा धोका, LBS रोडवर फुटपाथ आहेत की शौचालयं तेच समजेना!
By सचिन लुंगसे | Updated: November 24, 2025 15:59 IST2025-11-24T15:57:02+5:302025-11-24T15:59:31+5:30
मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सुलभ शौचालये अत्यंत अस्वच्छ आहेत.

बाईमाणसांनी जायचे कुठे? अस्वच्छतेमुळे आजाराचा धोका, LBS रोडवर फुटपाथ आहेत की शौचालयं तेच समजेना!
मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सुलभ शौचालये अत्यंत अस्वच्छ आहेत. एकवेळ पुरुषांना त्यांचा वापर करता येईल, पण बाईमाणसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बहुमतांशी शौचालये अस्वच्छ असल्याने ती असून नसल्यासारखीच आहेत. तर काही रस्त्याच्या आड असल्याने रात्री त्याचा वापर करणेही गैरसोयीचे असल्याचे वास्तव महिलांनी मांडले आहे. अस्वच्छ शौचालयांमुळे आजारपण वाढण्याची भीती महिलांनी व्यक्त केली आहे.
सायन रेल्वे स्थानकापासून ठाण्यापर्यंतचा एलबीएसचा प्रवास सुरू केल्यानंतर धारावी नेचर पार्क, कुर्ला कोर्ट, कल्पना सिनेमापर्यंत स्वच्छ शौचालये नजरेस पडत नाहीत. येथील फुटपाथवरच्या गटारातच रात्री-अपरात्री आडोशाचा आधार घेत पुरुषांना लघुशंका उरकावी लागते. घाटकोपर दिशेकडील चिराग नगरच्या विरुद्ध बाजूकडील फुटपाथवरच अनेकांकडून लघुशंका केली जाते. अंधेरी कुर्ला जोड रस्त्यावर काळे मार्गावरील पालिका उद्यानालगतच्या शौचालय वापराबाबत असंख्य अडचणी आहेत.
३ किलोमीटर मार्गावर शौचालय
घाटकोपर ते मानखुर्द दरम्यान बैंगणवाडी परिसरात ३ ते साडेतीन किमी अंतरावर पालिकेचे एकमेव शौचालय आहे. पैसे देऊन त्याचा वापर करावा लागतो. मात्र महिलांना पैसे देऊनही त्याचा वापर करता येणार नाही एवढे ते अस्वच्छ असते. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
फुटपाथवरच पुरुषांची लघुशंका
१. बैलबाजार पोलीस चौकीपासून साकीनाक्याला जाणाऱ्या रस्त्यावर विमानतळाच्या भिंतीलगतचा फुटपाथही लघुशंकेसाठी वापरला जातो. जरीमरीपासून साकीनाक्यापर्यंत पुरुषांना लघुशंकेसाठी शौचालये असली तर महिलांची अडचण या संपूर्ण पट्ट्यात आहे.
२. कमानीपासून कोहिनूर सिटीकडे जाताना असलेल्या शौचालयालगत काम सुरू असल्याने बॅरिकेट्स लागवण्यात आले आहेत. हे शौचालय महिलांना वापरता येत नाही.
३. विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला बस स्टँडलगतचे शौचालय पुलाच्या कामामुळे जमीनदोस्त केले आहे. कुर्का रेल्वे स्तानकाच्या पश्चिम बाजूला बस स्टँडलगतच्या शौचालयाचीही तीच तऱ्हा आहे.
अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत. पण त्यापैकी किती स्वच्छतागृहे वापरण्याजोगी आहेत? त्यात घाणीचे साम्राज्य आहे. नोकरदार सामान्य स्त्रियांना तर अस्वच्छ शौचालय वापरणे कठीण होते.
- समिधा नलावडे
कांजुरमार्गच्या सेंट झेवियर्स शाळेपुढे शौचालय आहे. त्यामुळे मंगतराम, सोनापूरमध्ये कुठेच शौचालय नाही. बहुमतांशी शौचालये अस्वच्छ असल्याने वापरता येण्याजोगी नाहीत. हॉटेलचालक त्यांचे शौचालये वापरू देत नाही. पेट्रोलपंपावरही शौचालये नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
- शीतल कुराडे