Join us

प्रशासन आहे कुठे? कोणीही ज्येष्ठांच्या डब्यात घुसतो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:59 IST

- महेश कोले, प्रतिनिधीकलने प्रवास करणाऱ्यांपैकी ज्येष्ठ नागरिक हा महत्त्वाचा वर्ग आतापर्यंत दुर्लक्षित होता. ज्येष्ठांना गर्दीतून प्रवास करताना त्रास होतो ...

- महेश कोले, प्रतिनिधी

कलने प्रवास करणाऱ्यांपैकी ज्येष्ठ नागरिक हा महत्त्वाचा वर्ग आतापर्यंत दुर्लक्षित होता. ज्येष्ठांना गर्दीतून प्रवास करताना त्रास होतो हे लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने त्यांच्यासाठी विशेष डबा उपलब्ध केला आहे. मध्य रेल्वेने तो वापरातही आणला. हे एक सकारात्मक पाऊल आहे. मात्र, केवळ स्वतंत्र डब्याची व्यवस्था करून समाधान मानता येणार नाही. या सुविधेचा  केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी वापर कसा होईल?, गैरवापर कसा रोखता येईल?, याकडे रेल्वेने लक्ष दिले पाहिजे. कारण ज्येष्ठांच्याही डब्यात घुसखोरी होत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत.  

दररोज साधारण ५० हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक गर्दीमुळे उभ्याने प्रवास करतात किंवा अपंगांच्या डब्यात चढून अपघाताचा धोका पत्करतात. या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी प्रत्येक लोकलमध्ये केवळ १४ आरक्षित जागा होत्या, त्याही सर्वसाधारण डब्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात. पण, गर्दीच्यावेळी इतर प्रवासी त्या बळकावत असत आणि ज्यांच्यासाठी त्या राखीव होत्या त्यांना त्याचा लाभ मिळत नसे. शिवाय, सर्वसामान्य प्रवाशांसह गर्दीच्यावेळी गाडीत चढ-उतार करताना होणारे धक्काबुक्कीसारखे प्रकार वॉकर किंवा काठी वापरणाऱ्या ज्येष्ठांसाठी जीवघेणे ठरत होते. आता किमान स्वतंत्र राखीव डबा मिळाल्याने ज्येष्ठांना प्रवासात काहीअंशी तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अपंगांच्या राखीव डब्यातही धटधाकट प्रवासी बसतात. मग, ज्येष्ठ नागरिकांच्या डब्याचे काय होईल? 

ज्येष्ठांचा डबा मध्यभागी ठेवाअनेक ज्येष्ठ नागरिक नोकरी-व्यवसाय करतात. काहींना पेन्शनसाठी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. गुडघे दुखी, लांबचे कमी दिसणे असा त्रास अनेकांना असतो. त्यामुळे राखीव डबा लोकलच्या मध्यभागी ठेवावा. जेणेकरून दोन्ही दिशांकडून आलेल्या ज्येष्ठांना तो सहज गाठता येईल. याशिवाय प्लॅटफॉर्मवर एस्कलेटर, लिफ्ट आणि व्हीलचेअर सेवा उपलब्ध कराव्यात. 

कुठल्याही चांगल्या योजनेसाठी जनजागृतीचीही आवश्यकता असते. ज्येष्ठांच्या डब्याची माहिती तिकीट बुकिंगच्या वेळी, स्टेशनवरील उद्घोषणांमधून आणि फलकांवर दिली गेली पाहिजे.  अन्य प्रवाशांना ज्येष्ठांच्या डब्यात न चढण्याचे आवाहन रेल्वेने केले पाहिजे. रेल्वेने ज्येष्ठांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.  मधु कोटियन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ.

ज्येष्ठांच्या डब्यात सर्वसाधारण प्रवासी घुसले, तर रेल्वेचे उद्दीष्ट साध्य होणार नाही. म्हणून नियमित तपासणी आणि घुसखोरांवर कठोर कारवाई करावी लागे.  रेल्वेने या डब्यात सीसीटीव्ही, रेल सुरक्षा बल (आरपीएफ)ची देखरेख, वेळोवेळी मोहीम अशा गोष्टींची आखणी केली, तरच याचा फायदा होईल. अन्यथा हा डबा देखील इतर डब्यांसारखा सर्वसामान्यांचा होऊन बसेल.

टॅग्स :लोकल