महापालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, नाट्यगृह, वाचनालय, स्वच्छ चांगले फुटपाथ, चांगले उद्यान, स्थानिक पातळीवरची चांगली आरोग्य सुविधा या विषयांची चर्चा व्हावी असे नागरिकांना वाटते. लोकांचे हे प्रश्न कसे सोडवले जाणार? याची उत्तरे नागरिकांना हवी असतात. मात्र धर्म, भाषा, जात या पलीकडे निवडणुका जायला तयार नाही. आरे ला कारे म्हणणे, ठोकाठोकीची भाषा करणे, अत्यंत टोकाला जाऊन राजकारण करणे याच गोष्टी निवडणुकीत जाणीवपूर्वक आणल्या जातात. कारण सामान्य जनतेच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर उमेदवारांना आणि पक्षांना बोलायचेच नसते, असा समज दृढ होत चालला आहे. म्हणूनच हा स्तंभ तुमच्यासाठी. नेत्यांच्या राजकारणात सर्वसामान्य नागरिकांचे मुद्दे गेले कुठे? असा सवाल या स्तंभामधून निवडणुका होईपर्यंत विचारला जाईल.
वेलकम : खड्डे, गढूळ पाण्याच्या ॲडव्हेंचर टूरसाठी ‘येथे’ या ! मा लवणी म्हाडा गेट क्र. ८ परिसरात ‘वेलकम टू म्हाडा’ असा मोठा बोर्ड अभिमानाने झळकतो आहे; पण त्या बोर्डाखालूनच सुरू होते खरी ॲडव्हेंचर टूर. खड्ड्यांचा रस्ता, त्यात साचलेले गढूळ पाणी आणि त्यातून वाट काढणारे नागरिक. बरं, या म्हाडा सोसायटीत तुम्ही रिक्षाने जायचे ठरवले तर चालकही जोखमीचे पैसे मोजूनच ५० ते ६० रुपयांचे एक्स्ट्रा मीटर फिरवतो. हे म्हणजे ‘स्पेशल म्हाडा चार्ज.’. आणि हा सगळा रोजचा त्रास? ज्याच्याशी स्थानिक राज्यकर्त्यांचे मुळीच देणे-घेणे नाही; कारण सामान्य माणसांचे प्रश्न पाहायला वेळ आहे तरी कुणाकडे? तत्कालीन नगरसेविकेने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली स्मारक उभे करायला कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेकडे पाहायला मात्र विसरली, असे स्थानिक सांगतात. एकूण काय, वेलकम टू म्हाडा म्हणजेच... खड्डे, पाणी, अपघाताचा धोका आणि नागरिकांच्या संयमाची रोजची परीक्षा...!
सांगा : मुलांनी धारावीतील मैदानात खेळायचे कसे?म हापालिकेच्या जी-उत्तर विभागांतर्गत येणाऱ्या धारावीतील खेळाच्या मैदानाची अवस्था वाईट झाली आहे. एन. शिवराज खेळाच्या मैदानातील खेळणी तुटलेली आहेत. मैदानात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. सांडपाणी वाहते आहे. अशा स्थितीतच नाईलाजाने लहान मुले मैदानात खेळताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकही विरंगुळ्यासाठी मोठ्या संख्येने या मैदानात येतात. त्यांनाही त्याचा त्रास होतो. मैदानातील अस्वच्छतेबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही काहीच फलित निघत नाही. ज्येष्ठ नागरिक संघाचे दिलीप गाडेकर यांनी ही दुरवस्था अनेकदा महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, महापालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्यापैकी कोणालाच धारावीतील मैदानाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, ही वस्तुस्थिती आहे.
दुर्गंधी : कुर्ला पश्चिमेतील बस स्थानक स्वच्छ कधी होणार?रेल्वे स्टेशनमधून कुर्ला पश्चिमेला बाहेर आल्यानंतर बेस्टच्या स्थानकात कायम अस्वच्छतेचे दर्शन घडते. मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुल, वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी येथे असते. या ठिकाणाहून बेस्ट बस, शेअर रिक्षाही सुटतात. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. बसस्थानक परिसरातील शौचालयाशेजारी कचरा जमा केला जातो. सफाई कर्मचाऱ्यांनी तो उचलल्यानंतरही ओला कचरा व खाली पडलेल्या कचऱ्यामुळे अनेकदा येथे त्याचे ढीग दिसतात. त्यामुळे प्रवाशांना येथे कायम नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात येथे बिकट परिस्थिती असते. प्रवाशांना या स्थानकात उभे राहणेही नकोसे होते. ‘स्वच्छ मुंबईचा’ नारा देणाऱ्या महापालिकेने ही परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत प्रवासी आणि स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.
माती : या ‘व्यवस्थानिर्मित’ प्रदूषणाकडेही जरा लक्ष द्या! सायन, प्रतीक्षानगर येथे आणिक आगार बस डेपोच्या रस्त्यावर एकीकडे वडाळा ते कासारवडवली मेट्रोचे काम, तर याच परिसरात मेट्रोच्या गर्डर निर्मितीचे देखील काम सुरू आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड माती, रेती, दगड रस्त्यावर पडून आहेत. रेतीने भरलेले ट्रक तर ओळीने उभे असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. जिथे धूलिकण जास्त आहेत तिथे नियमित पाणी मारणे अपेक्षित आहे; पण तेही होत नाही. या परिसरात हा एकमेव प्रशस्त रस्ता आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ नागरिक येथे चालण्याचा व्यायाम करण्यासाठी येतात. मात्र, इथे व्यायाम केला तर त्याने शरीराला फायदा होण्याऐवजी शरीराची हानीच अधिक होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Citizens demand solutions for basic amenities like roads, water, and healthcare. Instead, elections focus on divisive issues, ignoring the real problems faced by ordinary people in areas like Kurla, Dharavi and Sion.
Web Summary : नागरिक सड़क, पानी और स्वास्थ्य सेवा जैसी बुनियादी सुविधाओं के समाधान की मांग करते हैं। इसके बजाय, चुनाव विभाजनकारी मुद्दों पर ध्यान केंद्रित करते हैं, कुर्ला, धारावी और सायन जैसे क्षेत्रों में आम लोगों की वास्तविक समस्याओं को अनदेखा करते हैं।