जिया खान हत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2015 02:40 IST2015-11-19T02:40:36+5:302015-11-19T02:40:36+5:30
अभिनेत्री जिया खानच्या हत्येप्रकरणाचा तपास कुठवर आला? आतापर्यंत काय करण्यात आले? अशी विचारणा बुधवारी सत्र न्यायालयाने सीबीआयकडे केली. या आत्महत्येप्रकरणात

जिया खान हत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला ?
मुंबई : अभिनेत्री जिया खानच्या हत्येप्रकरणाचा तपास कुठवर आला? आतापर्यंत काय करण्यात आले? अशी विचारणा बुधवारी सत्र न्यायालयाने सीबीआयकडे केली. या आत्महत्येप्रकरणात अभिनेता आदित्य पांचोली याचा अभिनेता मुलगा सूरज पांचोली आणि झरिना वहाब हे आरोपी आहेत.
या आधीच्या सुनावणीवेळी सीबीआयच्या अधिकाऱ्याने तपास पूर्ण झाल्याचे न्या. ए. एस. शेंडे यांना सांगितले होते. तपास पूर्ण झाला, तर अद्याप आरोपपत्र का दाखल करण्यात आले नाही? तपास सीबीआयकडे वर्ग करून एक वर्ष उलटले, असे न्या. शेंडे म्हटले.
जियाच्या आईने ही केस लढवण्यासाठी नियुक्त केलेले वकील दिनेश तिवारी यांची, या केसमध्ये सीबीआयचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही बुधवारी न्यायालयाला देण्यात आली. बुधवारच्या सुनावणीवेळी सीबीआयतर्फे कोणीही न्यायालयात उपस्थित नव्हते. मात्र, सूरज पांचोलीने न्यायालयात हजेरी लावली.
३ जून २०१३ रोजी जिया खानने आत्महत्या केली. या प्रकरणी सूरजला १० जून २०१३ रोजी अटक केली. त्या विरुद्ध सूरजने जामीन मिळवला. मात्र जियाची आई राबिया खान यांनी जियाने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. (प्रतिनिधी)