“माझे आई-वडील कुठे आहेत?”; जखमी तरुणाचा सेंट जॉर्जेसमधील डॉक्टरांना सवाल
By संतोष आंधळे | Updated: December 19, 2024 05:12 IST2024-12-19T05:12:21+5:302024-12-19T05:12:44+5:30
प्रवासी बोट दुर्घटनेतील सुटका केलेल्या ५६ प्रवाशांना जेएनपीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

“माझे आई-वडील कुठे आहेत?”; जखमी तरुणाचा सेंट जॉर्जेसमधील डॉक्टरांना सवाल
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मालाड येथे राहणारा तरुण भाटी (१४) आई संतोषीदेवी व वडील अन्साराम यांच्यासोबत एलिफंटा लेणी बघण्यासाठी आला होता. तेव्हा बोटी अपघातात तिघेही पाण्यात पडले. तरुणने लाइफ जॅकेट घातले. त्याला आजूबाजूला असलेल्या बोटीने वाचविले आणि उपचारास सेंट जॉर्जेस रुग्णालयात पाठवले. त्याच्यावर चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी तरुण 'माझे आई-वडील कुठे आहेत?', असे डॉक्टरांना विचारत होता. तरुण याने सांगितले की, मी बरा आहे. मला माझ्या आई-बाबांना भेटायचे आहे. ते कुठे आहेत?
'मी त्या दुर्घटनेचा व्हिडीओ काढला'
गौतम गुप्ताने सांगितला थरार मी बोटीच्या टपावर बसलो होतो. एक बोट भरधाव वेगाने आमच्या बोटीच्या भोवती गिरक्या मारत होती. मी ते सर्व माझ्या मोबाइलवर शूट करत होतो. तीन-चार वेळा बोटीने गिरक्या मारल्या आणि चौथ्या वेळी ती बोट आमच्या बोटीवर येऊन आदळली. त्यामुळे आमची बोट उलटली. त्यावेळी मी, माझी बहीण रिता आणि आई रामजी देवी आम्ही सर्व पाण्यात पडलो. त्यावेळी मी आणि माझ्या बहिणीला आजूबाजूच्या बोटीने आलेल्या लोकांनी वाचविले. मात्र, आमची आई अजूनही बेपत्ता असल्याचे गौतमः गुप्ता याने सांगितले. गाझीपूर येथून गौतमची बहीण आणि आई मुंबईला फिरण्यासाठी आले होते.
प्रकृती स्थिर आहे. त्यांना पुढील उपचारास्ता स्व. दास दाखल करून घेण्यात आले आहे. काही रुग्णांचे एक्स-रे आणि रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. सर्व रुग्णांना वॉर्डमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. - डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय
सुटका केलेले ५७ पर्यटक जेएनपीटी रुग्णालयात
उरण : प्रवासी बोट दुर्घटनेतील सुटका केलेल्या ५६ प्रवाशांना जेएनपीएच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १२ वर्षांच्या एका अनोळखी मुलाचा मृतदेहही या रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. जेएनपीएच्या रुग्णालयात दाखल असलेल्यांमध्ये दोन परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाइकांचा अद्यापही थांगपत्ता लागला नसल्याची माहिती एसीपी अशोक राजपूत यांनी दिली.
जेएनपीए रुग्णालयात दाखल असलेल्या जवळपास सर्वच पर्यटकांजवळचे पैसे, सामान हरवले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था आणि खर्चासाठी काही रक्कमही जेएनपीए कामगार ट्रस्टी दिनेश पाटील यांनी दिली आहे.