कुठे आहेत आदर्श स्थानके?

By Admin | Updated: April 26, 2015 22:56 IST2015-04-26T22:56:28+5:302015-04-26T22:56:28+5:30

देशभरातील रेल्वे स्थानकांना आदर्श स्थानके म्हणून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा पाच वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती

Where are the ideal stations? | कुठे आहेत आदर्श स्थानके?

कुठे आहेत आदर्श स्थानके?

मुंबई : देशभरातील रेल्वे स्थानकांना आदर्श स्थानके म्हणून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा पाच वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. या स्थानकांवर उत्तम सोयी-सुविधा दिल्यानंतर ती ‘आदर्श’ म्हणून ओळखली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र या घोषणेची अंमलबजावणी मुंबईच्या शहर आणि उपनगरातील रेल्वे स्थानकांवर अजूनही झालेली नाही. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात पुन्हा एकदा आदर्श स्थानकांची घोषणा करण्यात आली. मात्र यामध्ये मुंबईतील स्थानकांचा समावेश आहे की नाही, हे अद्याप रेल्वेकडून सांगण्यात आलेले नाही.
२००९-१० मध्ये माजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरातील ३७५ स्थानकांचा आदर्श स्थानके म्हणून विकास करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या स्थानकांवर पिण्याचे उत्तम पाणी, पुरेशी प्रसाधनगृहे, महिलांसाठी विश्रामगृहे, प्रतीक्षालय, कॅटरिंग व्यवस्था देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा, करी रोड, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, नाहूर, मुलुंड, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कर्जत, कसारा, खोपोली तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रोड, किंग्ज सर्कल, शिवडी, चेंबूर, बेलापूर,पनवेल, सानपाडा, तुर्भे, वाशी, सफाळे, टिळकनगर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, चर्नीरोड, मरीन लाइन्स, मुंबई सेन्ट्रल, दादर, लोअर परेल, वान्द्रे, अंधेरी, सांताक्रुझ, गोरेगाव, मालाड, बोरीवली, मिरा रोड, नायगाव, डहाणू रोड, विरार यांचा समावेश होता. मात्र या सर्व स्थानकांवर सर्वच सोयी-सुविधांची बोंब आहे. पिण्याच्या पाण्याची सोय असून नसल्यासारखीच आहे. प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत बिकट आहे. प्लॅटफॉर्मवर असणारी कॅटरिंग व्यवस्था स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवूनच चालविली जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही सतावणारा आहे. महिलांसाठी असणाऱ्या प्रसाधनगृहाची अवस्था दयनीय असल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि उत्तम दर्जाची प्रसाधनगृहे बांधण्याचे आश्वासन मध्य रेल्वेकडून दिले. त्यांच्या अंमलबजावणीस विलंब होत असतानाच मध्य रेल्वेकडून एक नवीन योजना तयार करण्यात आली. या मार्गावरील सर्व प्रसाधनगृहे हायफाय करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा प्रयोग ठाणे आणि सीएसटी स्थानकावर करण्यात येणार होता. ठाणे स्थानकात वातानुकूलित प्रसाधनगृहे बांधण्यातही आले. मात्र शुल्क आकारण्यात येत असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली.

Web Title: Where are the ideal stations?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.