कुठे नेऊन ठेवली बजेटमधील घरे?
By Admin | Updated: December 15, 2014 01:09 IST2014-12-15T01:09:55+5:302014-12-15T01:09:55+5:30
वाशी येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या मालमत्ता प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत. मात्र आयोजकांनी दावा केल्याप्रमाणे या प्रदर्शनात सर्वसामान्यांच्या बजेटमधील एकही गृहप्रकल्प नाही

कुठे नेऊन ठेवली बजेटमधील घरे?
नवी मुंबई : वाशी येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या मालमत्ता प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत. मात्र आयोजकांनी दावा केल्याप्रमाणे या प्रदर्शनात सर्वसामान्यांच्या बजेटमधील एकही गृहप्रकल्प नाही. स्वस्त घरांच्या नावाने केवळ धुळफेक केल्याने चाकरमान्यांची पुन्हा एकदा निराशा झाली असून कुठे आहेत, बजेटमधील घरे, असा संतप्त सवाल सर्वसामान्यांनी आयोजकांना उपस्थित केला आहे.
क्रेडाई-बीएएनएमचे पंधरावे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भरविण्यात आले आहे. कार्पोरेट थाटात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात मोठमोठे गृहप्रकल्प मांडण्यात आले आहेत. टोलेजंग टॉवर्स, आकर्षक बंगलो, रो हाउसेस, पेन्टा हाउसेस आदीप्रकारच्या महाड्या मालमत्ता येथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कमीत कमी बारा लाखापर्यंतची घरे येथे उपलब्ध असल्याचा दावा आयोजकांनी केला होता. प्रत्यक्षात मात्र तसा एकही गृहप्रकल्प या प्रदर्शनात नसल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई परिसरात उभारण्यात आलेल्या घरांची किमतही पंधरा ते वीस लाख रूपयांच्या घरात आहे. मग ही बारा लाखांची घरे आली कुठून असा सवाल, गोरेगांव येथून घर खरेदीसाठी आलेल्या सुरेश पाठारे यांनी उपस्थित केला आहे.
या प्रदर्शनात नवी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आकर्षक गृहप्रकल्प विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. असे असले तरी पनवेल तालुक्यातील उलवे, खोपोली, रोडपाली, तळोजा या सिडकोच्या नयना क्षेत्रातील नियोेजित गृहप्रकल्प मोठ्याप्रमाणात या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. मात्र त्यातील घरांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून स्वस्त घरांसाठी वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या चाकरमान्यांची यावर्षीच्या प्रदर्शनानेही निराशा केल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)