Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांची पदे पालिकेत भरणार कधी? २० महिन्यांपासून कार्यभार प्रभारींच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 08:32 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखत घेतल्यानंतरही मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची नियुक्ती रखडली आहे.

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखत घेतल्यानंतरही मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची नियुक्ती रखडली आहे. एमपीएससी आयोगाने मुलाखती घेतलेल्या उमेदवारांची यादी अद्यापही महापालिका प्रशासनाला दिली नाही. त्यामुळे महापालिकेच्या या भावी सहायक आयुक्तांना आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवाय पालिकेतील ही पदे ही रिक्त असल्याने प्रभारींच्या खांद्यावर अतिरिक्त भार पडत आहे. नाइलाजाने महापालिका प्रशासकाला पालिका विभाग कार्यालयाचा कारभार हा कार्यकारी अभियंता (प्रभारी सहायक आयुक्त) यांच्या खांद्यावर रेटावा लागत आहे.   

मागील २० महिन्यांपासून पालिकेतील अनेक वॉर्ड हे संबंधित पालिका अधिकारी-सहायक आयुक्तांशिवाय चालविले जात आहेत. त्यामुळे मुंबईतील वॉर्डनिहाय नागरिकांच्या समस्या आणि अडचणी वेळेत सुटत नसल्याची टीका याआधीच माजी विरोधी पक्षनेत्यांकडून होत आहे. मुंबई पालिकेत एकूण ३६ सहायक आयुक्तांची नियुक्ती केली जाते. मुंबईतील २४ वॉर्डांसाठी प्रत्येकी एक तर उर्वरित १२ सहायक आयुक्तांची नियुक्ती आणखी विविध विभागावर नियुक्ती केली जाते. दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणूक या एमपीएससीकडून होणे अपेक्षित आहे.

एमपीएससीकडून विलंब एमपीएससीकडून विलंब होत असल्याने या जागा भरल्या गेल्या नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहे. २०१९ साली प्रशासनासाठी १६ सहायक आयुक्तांची विनंती मुंबई पालिकेकडून करण्यात आली आहे. कोरोनामुळे या प्रक्रियेला उशीर झाला असून, याच्याशी निगडित परीक्षा या एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आल्या. त्यानंतर सहायक आयुक्त पदासाठीच्या मुलाखती ही पार पडल्या आहेत. मात्र एमपीएसीकडून अद्याप निवड यादी येणे बाकी आहे. आदित्य ठाकरेंचे ट्विट काय ? प्रत्येक वॉर्डसाठी नियुक्त सहायक आयुक्तच नसतील तर नागरिकांनी समस्या मांडायच्या कुणाकडे ? भ्रष्ट सरकारकडून त्यांच्या मर्जीतल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनाच या पदांची सूत्रे हाती दिली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची आर्थिक लूट होतच आहे मात्र त्यांच्या समस्या कायम आहेत. सहायक आयुक्त पदांच्या निवडीसाठी इतका वेळ का लागत आहे याची माहिती पालिकेने द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई