Join us

लोकलची वाहतूक रुळावर कधी येणार? प्रवासी संघटनांचा मध्य रेल्वे प्रशासनाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 11:15 IST

मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला आणि भोंगळ कारभाराचा निषेध केला. 

मुंबई :

सातत्याने बिघडणारे वेळापत्रक, प्रवाशांची वाढणारी गर्दी, रखडलेले प्रकल्प, स्थानकांची दुरवस्था, चुकीच्या ठिकाणी बसविलेले सरकते जिने, ‘वंदे भारत आणि एसी लोकलला दिले जाणारे प्राधान्य या सर्व प्रकारांमुळे मध्य रेल्वेचे प्रवासी आक्रमक झाले आहेत. प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला आणि भोंगळ कारभाराचा निषेध केला. 

मुंबई रेल प्रवासी संघ, कल्याण- कर्जत- कसारा रेल्वे प्रवासी संघटना, तेजस्विनी रेल्वे प्रवासी संघटना, तसेच कळवा, डोंबिवली, वांगणी, बदलापूर येथील प्रवासी संघटना यांच्या प्रतिनिधींनी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा असंतोष आक्रमक होऊन मांडला.    सर्व प्रवासी संघटनांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांची भेट घेतली. यावेळी लोकलचे वेळापत्रक बिघडवून मेल-एक्स्प्रेस, मालगाडीला प्राधान्य दिले जाते. तसेच लोकलच्या व्यस्त वेळापत्रकात ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला स्थान मिळते तर, दुसरीकडे वाढीव लोकल फेऱ्या चालविण्यास मध्य रेल्वेची नकार घंटा सुरू होते. यांसारख्या समस्यांचा पाढा संघटनांनी मांडला.

सकाळी गर्दीच्यावेळी साडेसात ते साडेनऊदरम्यान कल्याण ते सीएसएमटी मेल आणि पॅसेंजर गाड्या थांबवून फक्त लोकल ट्रेन चालवाव्यात. सामान्यांना न परवडणारी एसी लोकल वाढवायच्या असतील तर जुन्या रद्द करून वाढवू नयेत. मध्य रेल्वेच्या गाड्या १५ डब्यांच्या कराव्यात, महिला आणि प्रथम श्रेणी डब्यांमध्ये टीसी आणि सुरक्षा वाढवावी, अशा मागण्या केल्या. - सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ.