Join us  

कुर्ला स्थानक ‘उन्नत’ कधी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 2:08 PM

हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत केले जाणार आहे. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका उपलब्ध असल्या, तरी त्या मालगाडीच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे त्या मार्गिका वापरता येणार नाहीत.

मुंबई : मध्य रेल्वेवरील पाचव्या-सहाव्या मार्गिकेतील अडथळे दूर करण्यासाठी चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. त्याचबरोबर हार्बरवरील कुर्ला स्थानकही ‘उन्नत’ केले जाणार आहे. पनवेल-कुर्ला दरम्यान प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू असल्याने ते कधी होणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.पाचवी-सहावी मार्गिका कुर्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत आणण्यासाठी मध्य रेल्वेला जागेची अडचण आहे. त्यामुळे चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. 

हार्बरवरील कुर्ला स्थानकही उन्नत केले जाणार आहे. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका उपलब्ध असल्या, तरी त्या मालगाडीच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे त्या मार्गिका वापरता येणार नाहीत.

पनवेल-कुर्ला प्रवासासाठी फायदेशीर-   उन्नतच्या कामासाठी हार्बर मार्गावरील दोन फलाट आठ मीटरवर उचलले जाणार आहेत. त्यासाठी टिळकनगर स्थानकापुढे सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याखालून रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. -    हा उड्डाणपूल कुर्ला स्थानकातून पुढे कसाईवाडा पुलाजवळ उतरेल आणि तेथून सध्याच्या मार्गाला जोडला जाईल. या उड्डाणपुलावर हार्बर मार्गाचे दोन उन्नत फलाट असतील. त्याशिवाय येथे एक टर्मिनल फलाटही उभारला जाणार आहे.-   या टर्मिनल फलाटावरून पनवेलच्या दिशेने कुर्ला लोकल चालविल्या जातील. हार्बर मार्गावरील अनेक प्रवासी पनवेल-कुर्ला या दरम्यान प्रवास करतात. त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

कुर्ला स्थानक उन्नत केले जाणार आहे. या मार्गाचे काम एक तृतीयांश झाले असून, प्राथमिक कामे झाली आहेत. तसेच पुलाच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत.- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

कुर्ला स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दी नियंत्रणासाठी पायाभूत कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, परंतु रेल्वे प्रशासनाची काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे या प्रकल्पाची रखडपट्टी होते.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ 

टॅग्स :कुर्लाभारतीय रेल्वे